मुंबई: ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणिmumbai महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दहिसरमध्ये एका कार्यक्रमावेळी मॉरिस नोरोन्हा या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने अभिषेक ) यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये घोसाळकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिक शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून मॉरिस नोरोन्हा याच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह शुक्रवारी दहिसरमधील चर्चमध्ये दफन केला जाणार होता. मात्र, स्थानिकांनी मॉरिस नोरोन्हाचा मृतदेह चर्चमध्ये दफन करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर दहिसरच्या दौलतनगर परिसरात कडकडीत बंद पाळला जात आहे. या परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या परिसरात घोसाळकर कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग होता. मॉरिसने अभिषेक यांची हत्या केल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळेच आता स्थानिकांनी मॉरिसचे पार्थिव स्थानिक चर्चमध्ये दफन करण्यास विरोध दर्शवल्याची माहिती आहे. येथील लेडी ऑफ द इमॅक्युलेट कँसेप्शन चर्चच्या आवारात असणाऱ्या दफनभूमीत मॉरिस नोरोन्हाचा मृतदेह दफन करण्यात येणार होता. मात्र, स्थानिकांनी त्याला विरोध केला आहे. आता या चर्चचे फादर जेरी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. फादर जेरी यांनीही मॉरिसचा मृतदेह दफन करण्याची परवानगी नाकारली तर मॉरिसचे पार्थिव गोराई येथील सार्वजनिक दफनभूमीत नेण्यात येईल.
उद्धव ठाकरे घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेणार
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे हे बोरिवलीतील औंदुबर निवास येथे जाऊन घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन बोरिवलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्ययात्रेसाठी स्थानिक शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. काहीवेळापूर्वीच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी अडीचच्या सुमारास अभिषेक यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
फेसबुक लाईव्हनंतर नेमकं काय घडलं?
मॉरिस दहिसर-बोरिवली परिसरात एनजीओ चालवायचा. परिसरात मॉरिसची स्वयंघोषित नेता म्हणून ओळख होती. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.अभिषेक घोसाळकरांनी नोरोन्हा विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी घट्ट मैत्री देखील झाली होती. गुरुवारी रात्री दोघं सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह संपत आलं असताना मॉरिसनं गोळ्या झाडल्या.