बीड : राज्यसभेवरील महाराष्ट्रातील सहा जागांच्या निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. यापैकी तीन जागा भाजपला सहज जिंकता येणार असून निवडणूक बिनविरोध करण्याकडे पक्षाचा कल आहे. तीन जागांसाठी भाजपकडून नऊ नावांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती आहे. नावं अंतिम करण्यासाठी यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. यामध्ये विनोद तावडे, नारायण राणे, पंकजा मुंडे यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पंकजांसोबत राज्यसभेबाबत बोलणी झाली नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा उडवून लावल्या. पंकजा मुंडे यांना राज्यसभा उमेदवारी देण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं फडणवीस म्हणाले.
सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून मध्य प्रदेशची जबाबदारी सांभाळत असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांची सोमवारी रात्री उशिरा भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा चालली होती. या भेटीनंतर पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र उमेदवारी देण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं म्हणत फडणवीसांनी चेंडू टोलवला.
कोणाकोणाची नावं चर्चेत?
नारायण राणे
विनोद तावडे
पंकजा मुंडे
माधव भंडारी
चित्रा वाघ
संजय उपाध्याय
हर्षवर्धन पाटील
विजया रहाटकर
अमरिश पटेल
आज ८ फेब्रुवारीपासून राज्यसभेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरुवात होत आहे. अशातच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी रात्री उशिरा भेट झाल्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चांना उधाण आलं. विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विधानपरिषद असो वा राज्यसभा, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत यायचं. मात्र एकदाही त्यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षात त्यांना डावललं जात असल्याच्या चर्चांना तोंड फुटत असे.आता महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. भारतीय जनता पक्षाने अद्यापही त्यांच्या कोट्यातील उमेदवारांची घोषणा केली नाही. मात्र बीड जिल्ह्याला राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
