• Wed. Aug 13th, 2025

बापाचा राजीनामा, मुलाचं पाऊल कुठे पडतं बघावं लागेल, बाबा सिद्दीकी यांच्या एक्झिटवर विजय वडेट्टीवार सडेतोड

Byjantaadmin

Feb 8, 2024

मुंबई : काँग्रेसचे बडे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी पक्षाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सिद्दीकी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन राजीनाम्याची माहिती दिली. बाबा सिद्दीकी काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरु होती. ते अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र हा मोठा धक्का नाही. बापाने राजीनामा दिल्यावर आमदार मुलाची पावलं कुठे पडतात बघावं लागेल, अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“बाबा सिद्दीकी अजित पवारांसोबत जाणार, अजितदादांकडे निवडणूक चिन्ह असलं तरी जनतेला माहिती आहे की ते भाजपच्या इशाऱ्यावर चालणार. भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी अजित पवारांसोबत जाणार. एखाद्या व्यक्तीने जर धर्मांध शक्तीशी हातमिळवणी केली असेल, तर धर्मनिरपेक्ष विचारांचे मतदार डिस्टर्ब होणार नाहीत” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.’टीव्ही९ मराठी’ वृत्तवाहिनीशी फोनवरुन संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “हा काही मोठा धक्का-बिक्का काही नाही.. बाबा सिद्दीकी जाणार अशी चर्चा महिन्याभरापासून होती. शिवसेना फुटल्यानंतर पक्ष चिन्ह कोणाला मिळेल, हे ठरलेलं होतं. राष्ट्रवादीतून अजितदादा गेले, म्हणजे जनाधार गेला काय, तो पवार साहेबांच्या पाठीशी आहे. अजित पवार कोणाचे तर भाजपचे.. ते राष्ट्रवादीचे नाहीत. तसंच बाबा सिद्दीकी यांना मोठं घबाड मिळत असेल आणि त्यांनी केलेल्या पापातून, चौकशीतून मुक्तता मिळत असेल, तर चांगलं आहे. फक्त गोमूत्र शिंपडून घेत असताना त्यांनी शांत राहावं, हालचाल करु नये, एवढी अपेक्षा ठेवून शुभेच्छा देतो.” अशी स्पष्ट भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *