• Wed. May 7th, 2025

भाजप नको, पण सत्ता हवी; काँग्रेस नेत्यांनी शोधला नवा पॅटर्न; सिद्दीकींनंतर कोणाचे नंबर?

Byjantaadmin

Feb 8, 2024

मुंबई: तीन टर्म आमदारकी आणि ४ वर्षे राज्यमंत्रिपद भोगलेल्या बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचा हात सोडला आहे. काँग्रेससोबतचं ४८ वर्षांचं नातं संपुष्टात आल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली. बाबा सिद्दीकी लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवारांना मुंबईत एक मुस्लिम चेहरा मिळू शकतो.

सत्ता हवी, पण भाजपसोबत जायचं नाही. त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणामुळे अडचण होते. काँग्रेसचे अनेक नेते सध्या अशा कात्रीत सापडले आहेत. त्यांच्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आता पर्याय ठरत असल्याचं दिसत आहे. बाबा सिद्दीकी लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधू शकतात. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांचं नाव त्यावेळी चर्चेत आलं होतं.मुंबईत काँग्रेसचे केवळ ४ आमदार आहेत. पैकी ३ आमदार मुस्लिम समुदायातून येतात. झीशान सिद्दीकी, अस्लम शेख आणि अमीन पटेल काँग्रेस सोडू शकतात. अजित पवारांकडून त्यांना आपल्या गोटात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं ५ दिवसांपूर्वी दिलं होतं. शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेशी जुळवून घेता येत नाही. पण सत्तेत जायची इच्छा आहे, अशा मनस्थितीत असलेल्या काँग्रेसच्या आमदारांसाठी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय आहे.बापाचा राजीनामा आहे आणि लेकाची पावलं कुठे पडतात ते बघावं लागेल, अशी प्रतिक्रिया बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यामुळे वांद्रे पूर्वचे असलेले आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी काय करतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आपल्या कठीण काळात अजित पवारांनी आपल्याला साथ दिली होती, असं झीशान यांनी ४ दिवसांपूर्वीच सांगितलं आहे.

मालाड पश्चिमेचे आमदार अस्लम शेख आणि मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मुंबईत विधानसभेचे ३६ मतदारसंघ आहेत. पैकी १० मतदारसंघांत मुस्लिम मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत आल्यास त्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत होईल.

बाबा सिद्दीकी २०१७ पासून तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. मे २०१७ मध्ये इडीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) घोटाळ्याप्रकरणी सिद्दीकी आणि इतर काही जणांच्या संबंधित ठिकाणांवर जाऊन तपास केला होता. तसंच २०१८ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्या ४६२ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली होती. तेव्हापासून सिद्दीकी अडचणीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *