शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजुने निकाल दिला होता. पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने दिले. तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या फूटीवर लागला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या निकालानंतर अजित पवार यांनी जाहीर सभेत एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. तुमच्यात धमक होती तर स्वतः पक्ष काढायचा, असा सल्लाच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता. तेच भाषण पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या त्या भाषणात अजित पवार म्हणाले होते ‘अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि तो वाढवला मुंबईच्या शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली आणि हा पक्ष महाराष्ट्राच्या सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच पक्ष तुम्ही काढून घेतलात. त्यांचं चिन्ह काढून घेतलं. निवडणूक आयोगाने जरी निर्णय दिला असला तरी हा निर्णय जनतेला पटलाय का, त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर स्वतःचा काढा, तुम्हाला कोणी अडवलं होतं?’
'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
वाह रे पट्ठ्या…! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
मनसेने अजित पवार यांना थेट टार्गेट केले आहे. अजित पवार यांचे भाषण शेअर करत ‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? वाह रे पट्ठ्या…!असे कॅप्शन देखील दिले आहे. या आधी देखील मनसेने बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे, असे ट्विट करत अजित पवारांपेक्षा राज ठाकरे कसे उजवे आहेत, हे सांगितले होते.