नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात भाजप व शिवसेना यांच्यासह सरकारमध्ये सहभागी झालेला अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी आणि पक्षाचे ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह त्याच गटाकडे राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री जाहीर केला. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष सवलत देण्यात दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) युवती आघाडीच्या नेत्या सोनिया दुहान यांनी “अंत जल्दी आयेगा” अशा शब्दात अजितदादा गटाला इशारा दिला आहे. दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी गटातील नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला जाताना सोनिया दुहान यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.

सोनिया दुहान काय म्हणाल्या?
“आम्ही हे प्रकरण नक्कीच सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाणार आहोत. पण जो माणूस स्वतःच्या आई-वडिलांचा, कुटुंबाचा होऊ शकला नाही, तो एखाद्या देशा-प्रदेशाचा होऊ नाही शकत. लढाई तर होणारच आहे. काही लोकांच्या मदतीने ते पक्ष, निवडणूक चिन्ह बळकवण्याचा प्रयत्न करु शकतात, पण आमची ओळख, आमचं पक्ष चिन्ह हे शरद पवार आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत” असं सोनिया दुहान यांनी निक्षून सांगितलं.”शरद पवार नावाच्या योद्ध्यासोबत देशातील सर्व युवावर्ग आहे, आमचा प्रत्येक योद्धा हा शरद पवारांसाठी संकटमोचक आहे. शरद पवारांनी लोकांची घरं बांधली आहेत, तोडली नाहीत. त्यामुळे अंत जल्दी आयेगा, हे त्यांनी लक्षात ठेवावं” असा कडक इशारा सोनिया दुहान यांनी दिला.