लातूर, (जिमाका): ग्रामपंचायत स्तरावर 15 वा वित्त आयोगातून आरोग्य, शिक्षण व उपजीविका या अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा सुरु आहेत. या प्रशिक्षणामुळे महिला सबलीकरणास प्रोत्साहन मिळेल. तसेच महिलांना रोजगार मिळण्यास आणि व्यवसायाभिमुख कर्ज मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले.

लातूर तालुक्यातील कृष्णा नगर येथील ग्रामपंचायतीमध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षणास बुधवारी भेट दिल्यानंतर श्री. सागर बोलत होते. यावेळी प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले.कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यामुळे महिला आत्मनिर्भर होवून समृध्द जिवनाची वाटचाल करु शकतील. या प्रशिक्षणामुळे महिला लाभार्थीना रोजगार मिळण्यास मदत होईल. तसेच व्यवसायाभिमुख कर्ज सहजरित्या महिलांना उपलब्ध होवू शकेल , असे श्री. सागर यांनी सांगितले.
कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी प्रशिक्षणामुळे होणारे फायदे सांगून त्यांना बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्जाबाबत माहिती दिली. यावेळी दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, सौदर्यं प्रसाधने निर्मिती, बेकरी पदार्थ निर्मिती, चॉकलेट पदार्थ निर्मिती व उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण पुस्तिका व नॅशनल स्कील डेव्हलपेंट कार्पोरेशन पुरस्कृत संस्थेचे प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांनीही कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेतील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच लिंबाबाई ज्ञानोबा जाधव यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून उपस्थितांचे आभार मानले.