लातूर( प्रतिनिधी): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आज सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला फक्त घोषणांचा पाऊस आहे. कोणतेही भरीव, ठोस नियोजन नसताना मोठे स्वप्नरंजन मात्र या अर्थसंकल्पातून केले आहे. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, महागाई आणि बेरोजगारी यासह विविध समस्यामुळे देशातील जनता मोठ्या अडचणीत आलेले आहे. परिस्थितीत देशात बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने उपयोजना न करताच युवा वर्गासाठी खूप कांही केल्याची बढाई या अर्थसंकल्पात मारण्यात आली आहे. देशाला तेलबियाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने सरकारने मोठे कार्य करीत असल्याचे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सांगितले गेले असले तरी सोयाबीन आणि इतर तेलबियाचे कधी नव्हे एवढे भाव सध्या कोसळलेले आहेत, परिणामी शेतकरी पुन्हा या तेलबियांची लागवड करणार नाहीत अशीच त्यांची मानसिकता बनलेली आहे. या परिस्थितीत देश कसा आत्मनिर्भार होणार हा प्रश्न आज उपस्थित होतो आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे फक्त आश्वासनेच या अर्थसंकल्पात दिली गेली आहेत, मागच्या वेळी केलेल्या घोषणाची प्रतिपूर्ती न करता , या वर्षी जनतेला पुन्हा नव्याने आश्वासने दिली गेली आहेत, असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
