राठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. सातत्याने आंदोलन आणि उपोषणं करून त्यांनी सरकारला जंग जंग पछाडलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे हे लाखो मराठ्यांचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर धडकले होते. मराठा आंदोलकांनी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याची योजना आखली होती. परंतु, मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर (वाशी, नवी मुंबई) दाखल होताच राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना काढली. त्यानुसार कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केला जाणार आहे. तसेच ओबीसीत समाविष्ट केलेल्या मराठा व्य्क्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही जातप्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

दरम्यान, सगेसोयरेसंदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं. पुढील १५ दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा पारीत करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री DEVENDRA FADNVIS म्हणाले, मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेलं नाही. त्यावरून जरांगे पाटील यांनी मंगळवारी (३० जानेवारी) राज्य सरकारला इशारा दिला होता की, उद्यापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू केली नाही तर १० फेब्रुवारीपासून मी बेमुदत उपोषणाला बसेन. दरम्यान, राज्य सरकारने अद्याप या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील येत्या १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.