आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांचा विकास, शेतकरी, गरीब कल्याण, रोजगार या सगळ्यावर भाष्य करण्यात आलं. तसंच टॅक्स स्लॅब जैसे थे ठेवण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. रायगडमधल्या पेण या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्पावर कडाडून टीका केली. हा अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार आहे असं त्यांनी म्हटलंय.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“मी सगळ्या विधानसभा मतदारसंघात जाऊन मी लोकांना भेटणार आहे. आज पेणमध्ये येत असताना मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. शेवटचा अर्थसंकल्प आहे हे लक्षात घ्या. निर्मला सीतारमण यांनी जड अंतःकरणाने कार्य पार पाडलं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आहे. मी सगळा अर्थसंकल्प पाहिला नाही. पण हायलाईट्मध्ये वाचलं की देशात आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी आम्ही काम करणार आहोत. मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी पंतप्रधान मोदींसमोर हे बोलण्याचं धाडस केलं. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हे त्या बोलल्या. निवडणुका आल्यानंतर तरीही त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं की देशात फक्त तुमचे सुटाबुटातले मित्र नाहीत. तुमच्या मित्रांच्या पलिकडे सुद्धा देश आहे. ज्यात तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब आहेत. दहाव्या वर्षी या चार जाती तुम्हाला कळल्या. तुमच्या बरोबरचे अदाणी म्हणजे देश नाही. सुटाबुटातलं सरकार आता गरीबांकडे लक्ष द्यायला आलं आहे.” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
सगळा भुलभुलैय्या आणि थोतांड
आपल्या भाषणा UDHAV THAKRE पुढे म्हणाले, “महिलांकडे लक्ष देत आहात, मणिपूरमध्ये का गेला नाहीत? त्यांना सांगा आमच्या देशात महिला आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं. पण निवडणुकांमध्ये महिलांची मतं हवी आहेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आता महिलांसाठी काम करणार. बिल्किस बानोकडे जा, त्यांच्या अत्याचाऱ्यांना सोडलं होतं. त्यांना सांगा आम्ही तुझ्यासाठी काम करणार आहोत. शेतकऱ्यांनी जेव्हा वर्षभर आंदोलन केलं त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं. आता अतिरेक्यांना शेतकरी समजत आहात. हा सगळा भुलभुलैय्या आणि थोतांड आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार
पूर्वी जादूचे प्रयोग व्हायचे, अजूनही होत असतील. जादूगार कसे प्रयोग दाखवतो तुम्ही पाहिलं नसेल तर दिल्लीत जे जादूचे प्रयोग सुरु आहेत ते बघा. जादूच्या प्रयोगांत मी लहान असताना बघायचो, जादूगार यायचा रिकामी टोपी दाखवयाचा त्यावर फडकं ठेवायचा आणि एक मंत्र म्हणायचा आबरा का डबरा. त्यानंतर रिकाम्या टोपीत हात घालायचा आणि कबूतर काढून दाखवयाचा. हवेत ते कबूतर उडवायचा. आपण म्हणायचो हा अचाट माणूस आहे रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं माझं मत यालाच. त्यावेळी आपल्या लक्षात आलं नाही कबूतर उडून गेलं आणि टोपी आपल्याला घातली. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचाच प्रकार आहे. आता अमुकतमुक घोषणा करतील. फुकटात गॅस सिलिंडरही देतील. पण निवडणूक झाली की तिप्पट किंमत वाढवतील. तरुणांना नोकऱ्या देणार हे तर आम्ही दहा वर्षे ऐकतो आहोत. आम्हाला तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही. आता या सरकारला गाडायची गरज आहे. गाडायचं असेल तर आधी खड्डा खणावा लागेल, त्यात गाडून त्यावर मतांची माती टाकावी लागेल तर ते गाडले जातील. खड्डा खणण्यासाठी तुम्हाला घराघरांमध्ये जावं लागेल. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.