• Tue. Apr 29th, 2025

शरद पवार दिल्लीत, नातवाची ईडी चौकशी, पाठिंब्याला प्रतिभा आजी पक्ष कार्यालयात, रेवती सुळेही साथीला!

Byjantaadmin

Feb 1, 2024

मुंबई : एकीकडे पक्षातील फूट आणि दुसरीकडे निकटवर्तीयांच्या केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या चौकशा अशा गंभीर संकटाच्या परिस्थितीतून देशातील सर्वांत ज्येष्ठ अनुभवी नेते शरद पवार जात आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शरद पवार दिल्लीत आहेत. त्याचसमयी त्यांचे नातू रोहित पवार यांची केंद्रीय सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी चार दिवसांपूर्वी स्वत: शरद पवार पक्ष कार्यालयात १० तास तळ ठोकून होते. जेव्हा रोहित यांची चौकशी पूर्ण झाली, तेव्हाच ते कार्यालयाबाहेर पडले. आज त्यांची जागा चालविण्यासाठी पवार कुटुंबात कायम पडद्यामागून काम करणाऱ्या प्रतिभाकाकी पवार पक्ष कार्यालयात आलेल्या आहेत, जिथून ईडी कार्यालय केवळ हाकेच्या अंतरावर आहे. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांच्या लेक रेवती सुळे देखील उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या अनुपस्थितीत रोहित पवार यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रतिभाकाकी पक्ष कार्यालयात आल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

बारामती अॅग्रो कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सूडबुद्धीने केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याची भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली. गेल्याच आठवड्यात २४ जानेवारीला तब्बल ११ तास रोहित यांची चौकशी झाली. आज बुधवारी पुन्हा एकदा रोहित पवार यांना ईडीकडून आवतान धाडण्यात आलं आहे. सकाळीच रोहित पवार ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. त्याचवेळी प्रतिभाकाकी आणि रेवती सुळे मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आलेल्या आहेत.

शरद पवार यांचा कित्ता प्रतिभाकाकींना गिरवला

मागील आठवड्यात नातवाला ईडीचं निमंत्रण आल्यानंतर शरद पवार यांनी टॉप गिअर टाकत कार्यकर्त्यांमध्ये जान भरली. रोहित पवार सकाळी ईडी ऑफिसला पोहोचले तेव्हाच शरद पवार देखील पक्ष कार्यालयात आले. चौकश्यांनी चिंतित असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या. संसदीय राजकारणातील ५० वर्षाचे अनुभव कथन करताना आलेले चांगले वाईट प्रसंग शेअर केले. जोपर्यंत रोहित पवार कार्यालयात ईडी चौकशीसाठी होते, तोपर्यंत शरद पवार देखील शेजारीच असलेल्या पक्ष कार्यालयात तळ ठोकून होते. आज तोच कित्ता प्रतिभा पवार यांनी गिरवला.

बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या ईडी कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात आल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली तसेच रोहित पवार यांचाही नावाचा जयजयकार केला. प्रतिभाकाकींनी कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारत आणि खचाखच भरलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पाऊल ठेवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed