लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या ५२ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी या सेवा ऑनलाईन करण्याचा करण्याचा आदेश काढला असून त्यांच्याच हस्ते प्रजासत्ताक दिनी या सेवांचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३ (१) एक अन्वये प्राप्त अधिकारानुसार मनपा आयुक्तांनी हा आदेश काढला आहे.त्या अंतर्गत विविध विभागामार्फत पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिलीय प्राधिकारी त्यात नमूद करण्यात आले आहेत.विहित कालावधीत लोकसेवकाने सेवा नामंजूर केल्यास सक्षम प्राधिकार्यांकडे अपील करण्यासही नागरिकांना अधिकार आहे.प्रजासत्ताक दिनाचा मुख्य समारंभ पार पडल्यानंतर आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते संगणकाचे बटन दाबून या सेवांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आयुक्तांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपायुक्त मयुरा शिंदेकर,सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे,मुख्य लेखा परीक्षक कांचन तावडे मॅडम, संगणक विभाग प्रमुख अमित म्हेत्रे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.ज्या सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत त्यात जन्म व मृत्यू प्रमाणपत्र,विवाह नोंदणी, झोन दाखला,भाग नकाशा,बांधकाम परवाना, जोते प्रमाणपत्र,भोगवटा प्रमाणपत्र,अग्निशमन ना हरकत दाखला,मालमत्ता कर उतारा,थकबाकी नसल्याचा दाखला, दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे,वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे अशा एकूण ५२ सेवांचा समावेश आहे. शहरातील नागरिकांनी या सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करावा असे आवाहनही मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी याप्रसंगी बोलताना केले. या कार्यक्रमास कार्यक्रमास मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
