अटल भूजल योजनेतील स्पर्धेचा निकाल जाहीर

लातूर, दि.26 (विमाका) : लोकसहभागातून भूजलाचे संनियंत्रण, व्यवस्थापन करणे. जलसुरक्षा आराखडे करणे, त्यात समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे. भूजल पातळीतील तूट भरून काढणे. भूजलाची शाश्वत उपलब्धता साध्य करणे आदी उद्दिष्टांसाठी अटल भूजल योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले जाते. लातूर, धाराशिवमधील ग्रामपंचातींनी 2022-23 स्पर्धेत जिल्हास्तरीय भूजल समृद्ध पुरस्कार पटकाविले आहेत.
या स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्याच्या लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु) ग्रामपंचातीला प्रथम, निलंगा तालुक्यातील जाजनूरला द्वितीय, चाकुर तालुक्यातील वडवळ (ना.) ग्रामपंचायतीने तृतीय पुरस्कार पटकावला. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीस प्रथम, खामसवाडी ग्रामपंचायतीस द्वितीय, उमरगा तालुक्यातील भगतवाडीने तृतीय पुरस्कार मिळवला. या जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरूप प्रथम क्रमांकास 50 लक्ष, द्वितीय क्रमांकास 30 लक्ष तर तृतीय क्रमांकास 20 लक्ष रूपये असे आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, अमरावती , बुलढाणा, नागपूर या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींनाही या स्पर्धेत पुरस्कार मिळाले आहेत. एकूण 270 ग्रामपंचायतींनी यात सहभाग घेतला, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अटल भूजल योजनेचे सहसंचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी कळविले आहे