• Wed. Apr 30th, 2025

सर्व समाज घटकांना सोबत घेवून जिल्ह्याला विकासात अग्रेसर बनविण्यासाठी प्रयत्नशील – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

Byjantaadmin

Jan 26, 2024

शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य

·       जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी विविध स्पर्धांच्या आयोजनावर भर

लातूर, दि. 26 (जिमाका):  भारतीय राज्यघटनेला आदर्श मानून केंद्र व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासह सर्व सर्व समाज घटकांना सोबत घेवून जिल्ह्याला विकासात अग्रेसर बनविण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थितांना शुभेच्छा देताना ना. बनसोडे बोलत होते. सर्वप्रथम ना. बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे.  शेतीला संरक्षित सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा दुसऱ्या टप्प्यात 128 गावातील 3 हजार 660 कामांसाठी 135 कोटी 85 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यापैकी 16 कोटी 69 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच डोंगरी तालुका अशी ओळख असलेल्या जळकोट तालुक्यात तिरू नदीवरील 7 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यात आले आहे. यामुळे 2.24 दलघमी साठवण क्षमता तयार होणार आहे. त्याचा 496 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फायदा होणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

गतवर्षी खरीप हंगामात 1 रुपया विमा हप्ता भरून शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी घेतला. या योजनेतून जिल्ह्यात 2 लाख 91 हजार शेतकऱ्यांना 198 कोटी 79 लाख रुपये भरपाई मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेतून जिल्ह्यातील 43 विमा दावे मंजूर झाले असून आतापर्यंत 42 लाख रुपये अनुदान देण्यात आल्याचे ना. बनसोडे म्हणाले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून आतापर्यंत 239 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या उद्योगांसाठी 2 कोटी 43 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी यंदा 4 कोटी 46 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील बोरसुरी डाळ, पटडी चिंच आणि कास्ती कोथींबीर या तीन उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ना. बनसोडे यांनी यावेळी नमूद केले.

फळबाग लागवडीला प्रोत्साहन

शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत, यासाठी जिल्ह्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सन 2023-24 मध्ये 740 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत विविध बाबींसाठी 330 लाभार्थ्यांना 2 कोटी 2 लाख रुपये अनुदान देण्यात आल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न

बेरोजगार युवक-युवतींसाठी राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत असून या योजनेतून जिल्ह्यात 611 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी 6 कोटी 95 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 58 प्रस्ताव मंजूर झाले असून त्यासाठी 2 कोटी 35 लाख रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. तसेच केंद्र शासनाने बारा बलुतेदारांमधील 18 घटकांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जाहीर केली आहे. पारंपारिक व्यावसायिकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 872 जणांनी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा-2 सोबतच उदगीर, चाकूर येथे एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. तसेच जळकोट येथे मिनी एमआयडीसी उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. चाकूर एमआयडीसी निर्मितीसाठी 266 हेक्टरचा प्रस्ताव लवकरच उच्च स्तरीय समिती समोर मांडला जाणार आहे. लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा- 2 साठी 482 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही गतीने करण्यात आली आहे, असे ना. बनसोडे यांनी यावेळी नमूद केले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब

लातूर जिल्ह्याला आरोग्य वर्धिनीमध्ये राष्ट्रीय स्तरावर गौरविले होते. प्रगतीचा तो वेग कायम असून एनक्यूएएस कार्यक्रमात जिल्ह्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 उपजिल्हा रुग्णालये, 2 ग्रामीण रुग्णालये आणि 1 स्त्री रुग्णालयाला एनक्यूएएस प्रमाणपत्र मिळाले आहे. यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना गडचिरोली येथे कार्यरत असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारचे शौर्य पदक जाहीर झाले आहे. उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी उदगीर मतदार संघात 2023 मध्ये नवीन 9 हजार 500 महिला मतदारांची नोंदणी केली. त्यामुळे मतदार यादीतील लिंग गुणोत्तर 887 वरून 911 म्हणजे पोहचले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचा गौरव ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी आराखडा तयार

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागासाठी 39 कोटी 49 लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. लातूर शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान 2.0 अभियान अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. यासाठी 259 कोटी 22 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तसेच लातूर शहरातील भुयारी गटार योजनेसाठी 305 कोटी 19 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी क्रीडा विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. यासाठी या आर्थिक वर्षात कुस्ती, फुटबॉल, डॉजबॉल, तायक्वांदो, मल्लखांब खेळाच्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात आले. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील कुस्तीची सर्वात मोठी खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा उदगीर येथे  होणार असल्याचे क्रीडा मंत्री ना. बनसोडे यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम राबविला जात असून यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, त्यांना समाज कल्याण विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेतून 2023-24 मध्ये आतापर्यंत 4 हजार 845 विद्यार्थ्यांना 10 कोटी 41 लाख रुपयेचा लाभ देण्यात आला असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जिल्हा वार्षिक योजनेतून दिव्यांग बांधवांसाठी हायड्रोथेरेपी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमासाठी उमंग इन्स्टिट्यूटला 20 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या थेरेपीमुळे दिव्यांगत्व कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

मराठा समाज बांधवांसाठी विविध उपक्रम

मराठा समाजासाठी शासनाने ‘सारथी’ संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. महामंडळाने या आर्थिक वर्षात वैयक्तिक व्यावसायिक कर्जासाठी 498 जणांना 52 कोटी 25 लाख रुपये कर्ज मंजूर झाले आहे. या कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळ देणार आहे. यासोबतच जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांना दाखले वितरण करण्यात येत आहे. हा प्रश्न शासन स्तरावर प्राधान्याने हाताळला जात असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना व उदगीर सैनिक विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, स्वरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका, अटल भूजल योजना चित्ररथ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस, ईव्हीएम जनजागृती चित्ररथ या पथसंचालनात सहभागी झाले होते.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीरमाता, वीरपिता यांची ना. बनसोडे यांनी भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या विविध विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी ना. बनसोडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सदानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed