• Wed. Apr 30th, 2025

बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘हिरकणी हाट’सारखे उपक्रम आवश्यक -क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

Byjantaadmin

Jan 26, 2024

लातूर येथे ‘हिरकणी हाट’ जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीला प्रारंभ

·       लातूरकरांनी एकवेळ भेट देवून बचतगटांची उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन

·       ग्रामीण महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची 30 जानेवारीपर्यंत होणार विक्री

लातूर, दि. 26 (जिमाका):  ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘हिरकणी हाट’ अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे महिला बचतगटांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार असून प्रत्येक महिन्याला तालुकास्तरावरही असे उपक्रम होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांनी आज येथे केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानच्यावतीने लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे 26 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान आयोजित ‘हिरकणी हाट’ जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीच्या उद्घाटनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील महिला बचतगटांकडून उत्पादित होणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थ खरेदी करण्याची संधी ‘हिरकणी हाट’मुळे लातूरकरांना मिळाली आहे. आजच्या फास्टफूडच्या काळात ग्रामीण खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळणे दुरापस्त झाले आहे. मात्र ‘हिरकणी हाट’मध्ये महिला बचतगटांच्या दालनात अनेक ग्रामीण खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असून लातूरकरांनी या प्रदर्शनाला भेट देवून त्यांची उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन ना. बनसोडे यांनी केले. तसेच जिल्ह्यातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

प्रास्ताविकामध्ये श्रीमती क्षीरसागर यांनी जिल्ह्यात उमेद अभियान अंतर्गत महिला बचतगटांच्या वाटचालीची माहिती दिली. तसेच ‘हिरकणी हाट’मध्ये सुमारे महिला बचतगटांनी सहभाग घेतला असल्याचे सांगितले. ‘हिरकणी हाट’ प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ना. बनसोडे यांनी विविध बचतगटांच्या स्टॉलला भेट देवून पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed