दोघांवर गुन्हा दाखल : निलंगा पोलिसांनी केली कारवाई
निलंगा : शहरातील शिवाजीनगर भागातील दोन किराणा दुकानांमध्ये पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३७ हजारांचा गुटखा बुधवारी जप्त केला आहे. याप्रकरणी जवळपास गुरुवारी दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.पोलिसांनी सांगितले, गुटखा व सुगंधी तंबाखूवर महाराष्ट्रात बंदी असतानाही शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेशातून चोरटी वाहतूक करून शहरात सर्रास गुटखा विक्री चालू आहे. याबाबतची माहिती निलंगा पोलिसाला मिळताच बुधवारी दुपारी दोनच्या
सुमारास हाडगा नाका भागातील विठ्ठल संभाजी जाधव यांचे विठ्ठल किराणा स्टोअर्स येथे छापा मारून ४५ हजार २९९ रुपयांचा विविध प्रकारच्या नमुन्याचा गुटखा जप्त करण्यात आला. यावेळी दुकानदार फरार झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस.पी. गायकवाड करीत आहेत. तसेच, याच भागातील अंकुश पाटील यांच्या वैष्णवी किराणा दुकानावर
छापा मारला असता ९२ २६५ रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त करून ठाण्यात जमा केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेजाळ हे तपास करत असून फरार आहे. याबाबत अन्न व सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे फिर्यादीवरून विठ्ठल संभाजी अंकुश पाटील यांच्यावर गुन्हा करण्यात आला.
निलंगा तालुक्याला लागूनच कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे बसवकल्याण, भालकी, बिदर येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याची चोरटी आवक होत असते. त्यामुळे निलंगा शहरात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. बंदी असताना गुटखा येतोच कसा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
