ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली निघालेलं भगवे वादळ आता नवीमुंबईत (Mumbai) येऊन ठेपले आहे. सरकारकडून जरांगे पाटील?यांची मनधरणी सुरु आहे, दुसरीकडे ते उपोषणावर ठाम आहेत. वाशीमध्ये झेंडावंदन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. आझाद मैदानात जाणार असल्याचेच मनोज जरागें यांनी सांगितलं.
काय म्हणाले जरांगे पाटील?
सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही. थोड्या वेळात चर्चा होईल. सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमाला माहिती दिली जाईल. बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितलं.
मनोज जरांगे आजारी –
मनोज जरांगे पाटलांच्या पायाला सूज आल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांना आराम करण्याची गरज असल्याचं बोललं जातंय. मागील काही दिवस पायी दिंडी मुळे जरांगे यांना झोप मिळत नव्हती. मनोज जरांगे पाटील सध्या वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये निवासासाठी आहेत. तेथील सभेनंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यमध्ये चर्चा होणार आहे.
वाहतूकीत बदल –
वाशी एपीएमसी सेक्टर 19 चौकी बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक ५०७,५१७,५३३ चे प्रवर्तन वाशी बस स्थानक येथे पहिल्या बस पासून खंडित करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे वाशी बस स्थानकांकडून नेरूळकडे जाणारा आनंद ऋषी मार्ग हा शिवाजी चौकापासून बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक ५०४,५०२,५०५ इत्यादीचे अप दिशेचे प्रवर्तन सायन पनवेल मार्ग, शिवाजी चौक येथे यु वळसा घेऊन पुन्हा सायन पनवेल मार्गाने सकाळी ६.०० वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहे. बस मार्ग क्रमांक 533,517 व 507 वाशी बस स्थानक येथे पहिल्या बस गाडी पासून खंडित केले आहेत.
मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी पाठ फिरवली
मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. जरांगेंना भेटीसाठी येणाऱ्या शिष्टमंडळात देखील मंत्र्यांचा सहभाग दिसत नाही. मागील तीन शिष्टमंडळाच्या बैठकीतचे विभागीय आयुक्त उपस्थित होते, आज येणाऱ्या शिष्टमंडळात देखील एकही मंत्री नाही.
पोलिसांनी परवानगी का नाकारली?

पोलिसांनी दिलेल्या पत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्याची क्षमता 5000 ते 6000 आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. त्यामुळे आपण लाखोच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले आहे.