मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे. माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे. एक मराठा लाख मराठा असा आशय लिहिलेली चिठ्ठी लिहून 24 वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर शिवाजी माहोरे (वय 24 रा.वारेगाव ता. फुलंब्री) असे गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या तरुणाचं नाव आहे. ज्ञानेश्वर हा खाजगी वाहनावर वाहन चालक म्हणून काम करतो.त्याच्या वडिलांना दोन एकर शेती असून त्यावर ती उदरनिर्वाह भागत नसल्यामुळे ते मजुरी काम करतात. ज्ञानेश्वर हा शेतात असताना त्याने गळफास घेतला. ही बाब परिसरातील लोकांच्या लक्षात येतात त्यांनी तात्काळ माहिती फुलंब्री पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, जमादार संतोष डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानेश्वर याला तात्काळ रुग्णाला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.यावेळी घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. ज्ञानेश्वर यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली.त्यात मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे. माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे. एक मराठा लाख मराठा अशा आशयाची चिठ्ठी आढळून आली.एकीकडे मनोज जरांगे मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाजाला घेऊन मुंबईकडे जात असताना या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आयुष्य संपवल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वारेगाव या गावात शोककळा पसरली होती.
