• Wed. Apr 30th, 2025

महात्मा गांधींविषयी बदनामीकारक वक्तव्य, संभाजी भिडेंविरोधात फौजदारी तक्रार दाखल

Byjantaadmin

Jan 23, 2024

पुणे: ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडेंविरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा लागू होत नसला, तरी न्यायालयात केलेली खासगी फौजदारी तक्रार दाखल करून घेणे योग्य आहे,’ असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलोक पांडे यांनी दिला.’संभाजी भिडे यांचे वक्तव्य संपूर्ण समाजाविरोधात नसून, महात्मा गांधींबाबत केलेली व्यक्तिगत टीका आहे. त्यामुळे धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती करणे यासाठी भारतीय दंड संहितेत असलेले ‘कलम १५३ ए’ या प्रकरणात लागू होईल का,’ अशी साशंकताही न्यायालयाने निकालात व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०० नुसार तक्रारदारांची न्यायालयात बोलावून तपासणी करण्यास न्यायालयाने मान्यता दिली असून, त्यांचा जबाब २९ जानेवारीला घेण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.

महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यासह इतर अनेक राष्ट्रपुरुषांविरोधात बदनामीकारक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात पुणे न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. विश्वंभर चौधरी, डॉ. मेधा सामंत, अन्वर राजन, प्रशांत कोठडिया, संकेत मुनोत, जांबुवंत मनोहर आणि युवराज शाह यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले आणि ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांच्यामार्फत ही तक्रार दिली आहे.

या प्रकरणाची चौकशी करून ‘कलम १५३ ए’सह विविध कलमांन्वये भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीतून केली होती; परंतु न्यायालयाने या प्रकरणी दखलपात्र गुन्हा नसल्याचे सांगून कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.

– अॅड. असीम सरोदे

निर्णयाविरोधात अपील करणार

”महात्मा गांधींची बदनामी करण्याकरता केलेली वक्तव्ये म्हणजे संपूर्ण समाजाविरोधात केलेली नाहीत, तर ती गांधींबाबत केलेली व्यक्तिगत टिका होती,’ असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. या निर्णयाविरोधात अपील करणार आहोत,’ अशी माहिती अॅड. असीम सरोदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *