नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अधिवेशन नाशिक शहरात सुरु आहे. या अधिवेशनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद राऊत, विनायक राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह इतर नेते पदाधिकारी उपस्थित आहेत. या अधिवेशनात उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संबोधित केलं. नाशिकमध्ये अधिवेशन झाल्यानंतर शिवसेनेची सत्ता आली होती, आता पुन्हा अधिवेशन होतंय त्यामुळं शिवसेनेची सत्ता येईल, अशी आशा आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
प्रभू श्रीराम एकवचनी होते. तुमचा नेता ७२ तासाच्या आता विसरुन जातो ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप कुणावर केला आणि त्यालाच परत सोबत घेतो, कसले एकवचनी असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. देवाभाऊ एकवचनी एकवचनी म्हणतात, राष्ट्रवादीशी युती कधीही नाही असं म्हणतात आणि पहाटे आणि दुपारी पळून जाऊन लव्ह मॅरेज करतात, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या उद्घाटनाला ना निमंत्रण दिलं जातं ना कालच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं जातं. खेळाडू महिला, हाथरस, उन्नाव इथल्या महिला असतील त्यांना ते न्याय देत नाहीत. महिला राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून गाजर दाखवलं जातं. १९७१ च्या जनगणनेनुसार ५४३ खासदार असतील तर आता १३० कोटी लोकसंख्येसाठी एक हजारांहून अधिक खासदार असले पाहिजेत. त्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी २०३४ हे वर्ष उजाडेल. महिला राजकीय आरक्षण आम्हाला सध्या लगेच मिळणारचं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
रामायणानं शिकवलं की हरीण कधीच सोन्याचं नसतं, मृगजळाच्या मागं धाऊ नये. महाभारतानं आम्हाला एक गोष्ट शिकवली, कौरवांचं बहुमत होती, सत्ता असत्याच्या बाजूनं होती, शकुनी सारखे पाताळयंत्री लोक कूटनीतीने फासे टाकत होते तोपर्यंत कौरवांचा विजय होत होता. महाभारतात युद्ध सुरु झालं तेव्हा अंतिम विजय संख्येनं कमी असणाऱ्या पांडवांचा विजय झाला होता. अंतिम विजय आमचाच असेल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळे त्यांच्यासोबत आहेत. यशवंत जाधव, प्रताप सरनाईक ते अजित पवार आज त्यांच्यासोबत आहेत. किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर, अनिल परब यांच्यावर सत्तेच्या काळात आरोप नव्हते. तुम्ही आमच्यासोबत आला असता तर ईडीची कारवाई केली नसती असा इशारा दिला जातोय. पण, दमन यंत्रणेच्या विरोधात आम्ही लढू ,असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
आमच्या एका नेत्यानंही विरोधी पक्षांच्या महिलांबद्दल अपशब्द वापरले नाहीत. पण, तुमचे टिल्ली पिल्ली पोरं येतात, सुमार बुद्धीमत्तेचे लोक येतात पण तुमच्या ताटात काय पडलं ते बघा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.संजय राऊत म्हणाले की एवढा विषय घेतो आणि संपवतो. तुमच्या परवानगीनं सांगते विषय सुरु झालाय. हा विषय तेव्हा संपेल आपण जेव्हा एका एका गद्दाराला त्यांची जागा दाखवून देऊ आणि चाळीस गद्दारांना पाडू, असं सुषमा अंधारेंनी म्हटलं.
