निलंगा- दिनांक २३ जानेवारी २०२४ पासून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरीकांचे सर्वेक्षण तालुक्यात सुरु होणार असून या कामी नेमून दिलेल्या प्रगणकांनी सर्वेक्षणाची जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी या कामी निष्काळजीपणा केल्यास कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभादेवी जाधव यांनी दिला.
राज्य मागास आयोगातर्फे मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जावून करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण शहरी व ग्रामीण भागात होणार असून सर्वेक्षणातील विचारण्यात आलेली मुददेनिहाय माहिती अचूक व परीपूर्ण भरणे गरजेचे असून नागरीकांनी सर्वेक्षणासाठी येणा-या प्रगणकांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले.
सदर सर्वेक्षणासाठी १२५१ प्रगणक व १३९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांना निलंगा येथील केतकी मंगल कार्यालयात रविवारी सविस्तर असे प्रशिक्षण देण्यात येवून प्रत्यक्ष सर्वेक्षण दिनांक २३ जानेवारी पासून सुरु होणार आहे. सदर सर्वेक्षण हे मोबाईल अॅप वर मोहिम स्तरावर राबवून दिनांक ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणास तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रृंगारे, नायब तहसीलदार श्री प्रविण आळंदकर, नायब तहसीलदार श्री अनिल धुमाळ, गटविकास अधिकारी श्री. सोपान अकेले, मुख्याधिकारी श्री. गजानन शिंदे, श्री. मोजन, श्री. बळीराम गायकवाड, श्री. सूरज स्वामी, श्री. निळकंठ जाधव इ. मास्टर ट्रेनर उपस्थित होते.
