आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीच्या सर्वच अर्जाना मंजूरी

निलंगा/प्रतिनिधी
निलंगा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार स्वावलंबन कमिटी गठीत न झाल्यामुळे अनेक दिवसापासून संजय गांधी निराधार योजनेची बैठक कधी होणार याची प्रतीक्षा अनेक अर्जदारांना होती, ती बैठक नुकतीच संपन्न झाली असून यामध्ये १६८० अर्ज मंजूर झाले असून ६६५ अर्जामध्ये त्रुटी आढळल्यामुळे ते चौकशीसाठी ठेवण्यात आले आहेत. निसर्गाचा लहरीपणा नापिकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीचे संजय गांधी निराधार योजनेसाठी केलेली अर्ज सर्वच्या सर्व मंजूर केले असून यामुळे उघड्यावर पडलेल्या संसाराला मोठा हातभार लागणार आहे.
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शिफारशीनुसार लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार संजय गांधी निराधार अनुदान समिती नुकतीच नियुक्त करण्यात आली होती .
निलंगा तालुक्यातील २३०० पेक्षा जास्त अर्ज निराधार योजनेच्या अनुदानासाठी निलंगा तहसीलला प्राप्त झाले होते, त्याचे गांभीरे लक्षात घेऊन निलंगा आणि औसा येथील आमदारांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलण्यात आली,
दिनांक १९ जानेवारी रोजी निलंगा तहसील येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये २३८० पेक्षा जास्त अर्जाची छाननी करून १६८० पेक्षा जास्त अर्ज मंजूर करण्यात आले ६६५ अर्जामध्ये त्रुटी आढळल्याने ते अर्ज चौकशीसाठी ठेवण्यात आले आहेत अशी माहिती अध्यक्ष शेषराव मंमाळे यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत पूर्वी एक हजार रुपये अनुदान दिले जात असत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती महागाई व तुटपुंजा पैशावर गरजा भागत नाहीत म्हणून अनुदानात भरीव वाढ करून दरमहा प्रती लाभार्थ्याला दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे याचा चांगलाच लाभ गोरगरीब निराधार विधवा व आत्महत्याग्रस्त विधवा शेतकऱ्यांच्या पत्नीला झाला आहे. या झालेल्या संजय गांधी निराधार बैठकीत आत्महत्याग्रस्त विधवा शेतकऱ्यांच्या पत्नीचे सर्वच अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीस निलंगा तालुका संजय गांधी स्वावलंबन कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष शेषराव ममाळे सचिव तहसीलदार उषाकिरण शृंगारे शासकीय सदस्य गटविकास अधिकारी सोपान अकेले सदस्य हरिभाऊ काळे, सौ सुरेखा काळे, परमेश्वर धुमाळ, रवी कांबळे, महादेव मरे, अमृत बसवदे, किशोर लंगोटे, उत्तम अण्णा लासोने, भास्कर पाटील, या विभागाचे नायब तहसीलदार अनिल धुमाळ व विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते