परभणी: पतीने भर रस्त्यात आपल्या पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिची हत्या केल्याची भयंकर घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली. गुरुवारी (१८ जानेवारी) सकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. आपल्या पत्नीची हत्या मारणाऱ्या पतीचे नाव रोहित गायकवाड असून तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळत आहे.याविषयी सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी साडेसातच्या दरम्यान परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सरकारी रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्यावरून पती-पत्नी भांडण करीत जात होते. यावेळी भांडणादरम्यान पतीने आपल्या जवळील कोयता काढून तिच्यावर वार केल्याचं प्रत्यक्ष दर्शींनी सांगितलं. हे वार एवढे गंभीर होते की, त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात तेथेच रस्त्यावर पडली. आजूबाजूच्या लोकांनी त्या जखमी महिलेला बोरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या महिलेला परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारासाठी परभणी येथे घेऊन जात असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला.
लॉकडाऊनमध्ये पळून लग्न केलं, दोन वर्षांनी पत्नी माहेरी
प्राथमिक माहितीनुसार, २०२१ मध्ये लॉकडाऊनमध्ये या दोघांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. पतीसोबत दोन वर्ष राहिल्यानंतर ती गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या बोरी येथे माहेरी राहण्यासाठी आली होती. तिने बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयात नववीच्या वर्गात प्रवेशही घेतला होता. पण, पती हा मागील काही दिवसांपासून तिला सासरी नांदायला येण्यासाठी आग्रह करीत होता. ती सासरी जाण्यास तयार नव्हती. आज सकाळी पती संभाजी गायकवाड छत्रपती संभाजीनगर येथून बोरी येथे आला होता.
कोयता घेऊन पती पोलिसांत पोहोचला
आरोपी पती कोयत्यासह बोरी येथील पोलिस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने आपल्या पत्नीला मारले असल्याचे कबूल करून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून घेतले. तर मयत पत्नीच्या मृतदेहावर परभणी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. याविषयी अद्यापही गुन्हा दाखल झाला नसून पोलिस तपास करत आहेत.