मुंबई : मुख्यमंत्री-दोन उपमुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गाडीतील दाटीवाटीत बसलेला व्हिडीओ समाज माध्यमांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओवर विरोधकांकडून बरीच टीका झाली. याच व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच खवळले. व्हिडीओ व्हायरल करणारा मूर्ख आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला विभागातर्फे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात भव्य नारीशक्ती निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा दाटीवाटीच्या प्रवासाचा व्हायरल व्हिडीओ, नारीशक्ती निर्धार मेळावा अशा विविध विषयांवर अजित पवार यांनी भाष्य केलं.
जर केली नसती सुरत गुवाहाटी
तर कशाला झाली असती दाटीवाटी..!!!!#goodmorning pic.twitter.com/MFkKanbiFm— SushmaTai Andhare (@andharesushama) January 17, 2024
पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये कोण कुणाच्या गाडीत बसणार, कुठे बसणार हे चेक होत असतं. पुढे गाडीचा चालक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर मागे मी स्वत: होते, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे बसणार होतो. पण ताफा एकदम पुढे गेल्याने आमचे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश महाजन यांना बसायला गाडी नसल्याने मीच त्यांना म्हटलं आपण दाटीवाटीने जाऊ. शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही. एकमेकांना सांभाळून, एकमेकांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत, अशी सारवासारव अजित पवार यांनी व्हायरल व्हिडीओवर बोलताना केली.
जे व्हिडीओ व्हायरल करतायेत, त्यांची मला कीव करावीशी वाटते. विकासाचं बोलुयात ना आपण… गाडीत किती बसले, कोण बसले… अरे दाटीवाटीचा त्रास जे गाडीत बसले त्यांना होईल ना… तुम्हाला त्रास व्हायचं काय कारण आहे? असा प्रश्न अजित पवार यांनी संतापून विरोधकांना विचारला.
नको त्या विषयांवर बोलण्यात अर्थ नाही. त्यामुळे अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. पण गाडीत जागा असताना देखील तिसऱ्या व्यक्तीला आम्ही गाडीत घेत नाही. तो दार उघडा म्हणतोय पण आम्ही दार उघडत नाही, असं जर झालं असतं तर नक्की बोलण्याचा अधिकार होता. परंतु असं काहीही झालं नाही. विरोधकांनी उगीच कोणताही विषय मोठा करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.