रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी गुरुवारी सकाळीच एसीबीच्या पथकाने धडक देत चौकशी सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साळवींसह त्यांची पत्नी अनुजा साळवी आणि मोठा मुलगा शुभम साळवी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे साळवींवर अटकेची कारवाई होण्याची चिन्हं आहेत. “मी शिंदे गटासोबत आलो नाही, म्हणून तुम्ही राग काढला असेल, हे मी समजू शकतो. पण त्यासाठी माझ्यावर राग काढा, मला अटक करा, जेलमध्ये टाका, काहीही करा, पण माझ्या पत्नी आणि मोठ्या मुलावर गुन्हा दाखल करताय, जनता आणि आम्ही सोडणार नाही” अशी प्रतिक्रिया देताना राजन साळवींचा आवाज रडवेला झाला.राजन साळवी यांच्यावर साडेतीन कोटी रुपयांच्या बेनामी संपत्ती प्रकरणात एसीबीने कारवाई केली आहे. ज्ञात संपत्तीच्या तुलनेत ११८ टक्के जास्त रक्कम जमा असल्याचा साळवींवर आरोप आहे.
राजन साळवी काय म्हणाले?
“एसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी चालू आहे, पण मला मिळालेल्या माहितीनुसार एक दुःखाची बातमी आहे, ज्याची मला खंत वाटते, सकाळपासून एसीबीचे अधिकारी माझ्या घरी, आमच्या मूळ घरी, माझं हॉटेल, माझ्या भावाचं घर इथे चार पाच पथकं चौकशी करत आहेत, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, माझ्यावर गुन्हा दाखल करा, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे, त्यांच्या दृष्टीने मी काही गुन्हा केला असेल, पण राजन साळवी काय आहे, कसा आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे, पक्षाला, जनतेला आणि मतदारसंघालाही माहिती आहे, परंतु पोलीस, सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नी आणि मोठ्या मुलावर गुन्हा दाखल केला, ही खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, याचे परिणाम सरकारला निश्चितपणे भविष्यात भोगावे लागतील” अशी प्रतिक्रिया देताना राजन साळवी काहीसे हळवे झाले.
“मी एक लोकप्रतिनिधी आहे, माझ्याकडून तुमच्या मते काही चुकीचं घडलं असेल, शिंदे गट किंवा तुमच्यासोबत आलो नसेन, म्हणून तुम्ही माझ्यावर राग काढला असेल, तर माझ्यावर राग काढा, मला अटक करा, मला जेलमध्ये टाका, काहीही करा, पण माझ्या पत्नी-मुलावर गुन्हा दाखल करताय, तुम्हाला ही जनता आणि आम्ही सोडणार नाही” असा इशारा राजन साळवी यांनी दिला. “अजून चौकशी चालू आहे, माझं किंवा कुटुंबाचं स्टेटमेंट घेतलेलं नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत पाठीशी आहेत, विचारपूस केली, ते म्हणाले की तुझ्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आणि महाराष्ट्र आहे. गुन्हा दाखल झाला म्हणजे अटक होणारच आहे, अटकेला मी घाबरत नाही, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आमच्यावर इतकं कर्ज आहे, की मीच ते फेडायला सरकारकडे पैसे मागतो, मी आतापर्यंत कधी घाबरलो नाही, मला माहिती होतं की या घटना घडणार आहेत, एसीबीची पावलं पडताना मला समजत होतं, मी निश्चिंत होतो” असंही साळवी म्हणाले.