• Fri. May 2nd, 2025

राजन साळवींच्या घरावर एसीबीची धाड पडताच मातोश्रीवरुन तातडीने उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले…

Byjantaadmin

Jan 18, 2024

रत्नागिरी: एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर सत्तेत सामील न होता उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहणारे राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) छापा टाकण्यात आला. एसीबीच्या तीन ते चार पथकांनी राजन साळवी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापा टाकला. एसीबीच्या या छापासत्राची माहिती अवघ्या काही क्षणांमध्ये बाहेर फुटली. ही बातमी मातोश्रीपर्यंत पोहोचतात उद्धव ठाकरे यांनी तातडीने राजन साळवी यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. तसेच आपण अटकेच्या कारवाईलाही तयार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

Rajan Salvi ACB Raid

 

राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, लाचुलचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी मी राहत असणारे सध्याचे घर, मूळ घर, हॉटेल आणि माझ्या भावाच्या घरावर छापा टाकला. एसीबीची चार ते पाच पथकं त्यासाठी रत्नागिरीत दाखल झाली होती. सध्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या माहितीनुसार, एसीबीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला अटकही होऊ शकते, मी त्यासाठी तयार आहे. परंतु, खंत वाटणारी गोष्ट म्हणजे एसीबीने माझी पत्नी आणि मोठ्या मुलावरही गुन्हा दाखल केला आहे. राजन साळवी कसा आहे, हे माझ्या कुटुंबातील लोक आणि मतदारसंघातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे भविष्यात सरकारला या कारवाईचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राजन साळवी यांनी दिला.

राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचे संकेत दिले. परंतु, पत्नी आणि मुलावर दाखल करण्यात आलेला गुन्हा त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत होते. एसीबीची धाड पडल्याचे समजताच उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मोबाईलवर फोन केल्याचेही राजन साळवी यांनी सांगितले. माझ्या घरावर धाड पडल्याची माहिती समजली तेव्हा उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी माझी विचारपूस केली. राजन, संपूर्ण शिवसेना आणि महाराष्ट्र तुझ्या पाठिशी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितल्याचे राजन साळवी यांनी म्हटले.

मला काल रात्रीच माझ्या घरावर धाड पडणार याची कुणकुण लागली होती: राजन साळवी

एसीबी माझ्या घरावर धाड टाकणार, याची कुणकुण मला आधीच लागली होती, असे राजन साळवी यांनी म्हटले. रत्नागिरीत ज्याप्रकारे एसीबीची पावलं पडत होती, त्यावरुन मला अंदाज आला होता. एसीबीच्या पथकातील अधिकारी रत्नागिरीतील अल्फा हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांनी चौकशी सुरु केल्याची माहिती जिल्ह्यातील लोकांकडून मला मिळाली. त्यामुळे आज सकाळी एसीबीचे अधिकारी घरी येतील, याचा अंदाज मला होता. मी शिंदे गटात प्रवेश केला नाही म्हणून माझ्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दबाव आणण्याचा प्रकार आहे, असे राजन साळवी यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *