महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीत जागावाटपाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित दोन ते चार जागांबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने जागावाटपाच्या मुद्द्यावर त्यांनी मंगळवारी (ता. 16)NAGPUR येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची दुसरी महत्त्वाची बैठक लवकरच होणार आहे.
पहिल्या बैठकीत जागावाटपासंदर्भातील 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन ते चार जागांबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित जागांच्या विषयावर चर्चा होणार आहे. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा फार्म्युला अंतिम होईल.महायुतीत एकनाथ शिंदेंचे काय होईल, यावर आपण भाष्य करू शकत नाही. महायुतीच ते ठरवेल. महायुतीत गेलेले घटकपक्ष यांची स्थिती भविष्यात गुलामासारखी होणार आहे. एकतर त्यांना गुलामगिरी करावी लागेल किंवा महायुतीतून बाहेर पडावे लागेल. महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी ते जास्तीत जास्त जागा भाजपा स्वत:कडे ठेवणार आहे, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.विधानसभाध्यक्षांनी अपात्रतेबाबत दिलेला निर्णय अंतिम नाही. हा निर्णय अयोग्य असल्याचे अनेक ज्येष्ठ विधिज्ञांचे मत आहे. त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शविणारी भूमिका उद्धव ठाकरे घेत असतील तर ती योग्य आहे. रामदास आठवलेंची भाजपमधील स्थिती फारशी चांगली नाही. भाजप सांगेल त्या घाटावरचे पाणी पिण्याचे काम त्यांचे सुरू आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी यावेळी केली. ‘बीएसपी कॅडर’चा फरक महाराष्ट्रात होणार नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत काय झाले हे जनतेला ठाऊक आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, असे त्यांनी नमूद केले.जनतेची सेवा करण्यापेक्षा सत्तेसाठी लोक एकत्र येतात, तेव्हा महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झालेली मंडळी जनतेच्या सेवेसाठी नाहीत हेच दिसते. आता अशा राजकारण्यांबद्दल जनसामान्यांमध्ये मानसन्मान राहिलेला नाही. याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. CONGRESS नेते सुनील केदार यांनी व्यक्तिगत संबंधापोटी नरेंद्र जिचकार यांना साथ दिली असेल, तर त्यात गैर काही नाही. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला, म्हणून सोबत राहणे चुकीचे नाही, असे म्हणत वडेट्टीवार यांनी केदार यांची पाठराखण केली.