• Sat. May 3rd, 2025

मोदींच्या नाशिक दौऱ्यावेळी पाण्यासारखा पैसा खर्च केला, आता हिशेब जुळवताना अधिकाऱ्यांची तारांबळ

Byjantaadmin

Jan 16, 2024

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यासाठी शहर सजवा असा फतवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना खर्चासाठी मोकळे रान मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशात संधी शोधत पालिकेच्या यंत्रणेने आठ ते दहा दिवसांत अक्षरश: कोट्यवधींची उधळपट्टी केली आहे. परंतु, यंत्रणांनी केलेल्या खर्चाचा हिशेब शासनाकडून मागविला जाणार असल्यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. ठेकेदारांसाठी केलेल्या खर्चाचा हिशेब जुळवताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे.राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मोदी गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आले होते. या चार तासांच्या दौऱ्यात उद्घाटनासह रोड शो, काळाराम मंदिराला भेट, गोदाकाठाची पाहणी असे कार्यक्रम होते. हा दौरा यशस्वी करण्यासाठी शहर सजविण्याचे फर्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले होते. त्यामुळे हेलिपॅडपासून ते मोदी मैदानापर्यंत जाणारे रस्ते चकचकीत करण्यात आले. या दौऱ्यासाठी क्रीडा विभागाला जवळपास ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातून शहरात विविध प्रकारची कामे करण्यात आली. रोड शोदरम्यान झाडांवर झेंडूच्या फुलांच्या माळा लावणे, रस्ते दुरुस्ती करणे, नवीन रस्ते तयार करणे, गोदाघाट परिसरात रामायणातील प्रसंगांची चित्रे रंगविणे, नदीचा घाट स्वच्छ करणे, दुभाजकांची रंगरंगोटी, विद्युत पोलवर तिरंगी एलईडी लाइट लावणे, रामकुंडावर कृत्रिम लॉन्स टाकणे, सजावट करणे, पाण्याने रस्ते धुणे, वाहतूक बेटांची साफसफाई, बोर्ड रंगविणे, होर्डिंग्ज लावणे आदी कामे करण्यात आली. ऐनवेळी दौरा असल्यामुळे निविदा काढण्यासाठी वेळ मिळाला नाही. परंतु, हीच संधी साधत अधिकाऱ्यांनी ‘होऊ दे खर्च’ धोरण अवलंबत मर्जीतले ठेकेदार निश्चित केले. त्यामुळे सढळ हाताने उधळपट्टी झाली असली तरी, या खर्चाचा पंतप्रधान कार्यालयासह मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही हिशेब मागितला जाणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी आकड्यांची जुळवाजुळ सुरू केली आहे.

Nashik PM Modi visit

प्रत्येक खर्चाचा हिशेब हवा

क्रीडा विभागाकडून ५२ कोटींच्या निधीतून महापालिकेला निधी वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सढळ हाताने खर्च केला असला तरी ठेकेदारांना पोसण्याचे धोरण मात्र अंगलट येणार आहे. मोदींच्या या दौऱ्याच्या खर्चात डाग लागू नये म्हणून केंद्रीय यंत्रणांसह राज्याच्या यंत्रणाही लक्ष ठेवून आहेत. विरोधकांकडूनही आरोप होण्याची शक्यता असल्यामुळे यंत्रणा या खर्चाचा चोख हिशेब घेण्याची शक्यता आहे. हा हिशेब थेट क्रीडा व युवा संचालनालयाला सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

पंतप्रधान दौऱ्यात १३०० जणांवर उपचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक उद्घाटन कार्यक्रम दौरा नुकताच पार पडला. यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन दृष्टीने उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये मळमळ, ॲसिडीटी, डोकेदुखीसारखे त्रास झालेल्या १३०० जणांना गोळ्या-औषधे देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुमारे दीड लाख नागरिकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये काही जण आजारी पडणे अपेक्षित असते. काही जण पुरेसे पाणी जवळ ठेवत नाहीत, तसेच हवेतील बदल, दीर्घकाळ उन्हात राहणे यामुळे डोकेदुखी, मळमळणे, डिहायड्रेशनसारख्या सामान्य आजारांचा त्रास होऊ शकतो. जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरता वैद्यकीय आरोग्य विभाग उभारला होता. यामध्ये या आजारांच्या तक्रारी घेऊन आलेल्यांना ओआरएस पाणी, ग्लुकोज आणि अॅसिडीटीवर गोळ्या-औषधे, तसेच हलके अन्न देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे डॉ. देवमाने यांनी सांगितले. मोठ्या आणि खुल्या कार्यक्रमामध्ये एक-दोन टक्के लोकांना असा त्रास होतो, असे जिल्हा चिकित्सकांनी सांगितले. तर दोन व्यक्तींना एक दिवसासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी ठेवण्यात आली होती. यामध्ये ७० रुग्णवाहिका, तसेच अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली होती व सर्व वैद्यकीय अधिकारी हे कर्तव्यावर हजर होते, असेही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *