लोकसभा निवडणुकीअगोदर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठा धक्का बसल्यानंतर आता, ठाकरे गटाकडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसण्यात आली आहे.ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्यासोबतीला आता महिला आघाडीही प्रचाराच्या रिंगणात उतरली आहे. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच स्त्रीशक्ती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी, 16 जानेवारी रोजी विदर्भातून ही यात्रा सुरू होणार असून, यामध्ये जास्तीत जास्त महिलांशी संवाद साधला जाणार आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, शीतल देवरुखकर, संजना घाडी, रंजना नेवाळकर आणि राजूल पटेल या विदर्भातील विधानसभांचा आढावा घेणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे.महिला बचत गट, अंगणवाडीसेविकांचे प्रश्न याशिवाय समाजात अन्य क्षेत्रात कार्यरत महिलांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन, त्याबाबत आवाज उठवला जाणार आहे. रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा असणार आहे.विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल दिला. नार्वेकरांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. तसेच शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्णय दिला. नार्वेकरांच्या या निकालाविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला होता. आम्ही न्यायालयात जाणार, असे ठाकरे गटाचे नेते सांगत होते. मात्र, निकालानंतर चार दिवसांनंतरही ठाकरे गट न्यायालयात गेला नव्हता. मात्र, अखेर आज (सोमवारी) ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निकालाविरोधात याचिका दाखल करण्यात येणार आहे.न्यायालयात ठाकरे गट गेला असला तरी अंतिम निर्णय कधी येणार? न्यायालय यावर कधी सुनावणी घेणार, याची उत्तरे अजून मिळाली नाहीत. मात्र, लोकसभा निवडणूक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईसोबत ठाकरे गटाला जनतेच्या न्यायालयात जाऊन लोकसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध करावे लागेल, असे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.