मराठा आरक्षणासाठी आरपारच्या लढाईची तयारी आणि कुठल्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा निर्धार केल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी अंतरवाली ते मुंबईपर्यंत पोहोचण्याचे वेळापत्रकच जाहीर केले. 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघणारे मराठ्यांचे वादळ पायी आणि वाहनांनी असा सात दिवसांचा प्रवास करून मुंबई गाठणार आहे. मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रात मोठा लढा उभा केला. अंतरवालीतून सप्टेंबर 2023 मध्ये सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या या लढ्याने अनेक चढउतार, संकट आणि राज्य सरकारशी लढा देत आता थेट मुंबईत धडक देण्याचा निर्धार केला. सरकारला वारंवार वेळ, मुदतवाढ देऊनही मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला जात नाही. उलट राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण झाला आहे, असं आंदोलकांकडून सांगितलं जात आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक देण्याची घोषणा केली होती. अंतरवाली ते मुंबई आझाद मैदान पायी दिंडी काढत मुंबई गाठण्यासाठीची रुपरेषा, सोबत काय-काय घ्यायचे? याची सविस्तर माहिती गेल्या महिन्यात मनोज जरांगे-पाटील यांनी दिली होती. त्यानंतर गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा करीत या आंदोलनाची तयारी आणि आढावाही जरांगे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. आज मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवालीपासून पायी निघणारी मराठा आरक्षणासाठीची दिंडी मुंबईत कशी, कधी आणि कोणत्या मार्गाने दाखल होणार, याचे वेळापत्रकच जाहीर केले. त्यानुसार 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघणार आहे. सात दिवसांचा पायी आणि वाहनाने प्रवास करीत 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताकदिनी मराठ्यांचे हे वादळ मुंबईच्या आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे घोंघावणार आहे. सकाळी पदयात्रा आणि दुपारी 12 नंतर वाहनाने भोजन किंवा मुक्कामाच्या ठिकाणी असा हा सात दिवसांचा दिनक्रम असणार आहे. पदयात्रा मुंबईत पोहोचताच मनोज जरांगे-पाटील यांचे बेमुदत उपोषणही सुरू होणार आहे.
असे आहे वेळापत्रक…
20 जानेवारी 2024 – सकाळी 9.00 वा- अंतरवाली सराटीपासून पदयात्रेस सुरुवात. दुपारी भोजन – कोळगाव, ता. गेवराई
रात्री मुक्काम – मातोरी, ता. शिरूर
21 जानेवारी- दुपारी भोजन – तनपुरवाडी, ता. पाथर्डी
रात्रौ मुक्काम – बाराबाभली (करंजी घाट)
22 जानेवारी – दुपारी भोजन – सुपा
रात्री मुक्काम – रांजणगाव (गणपती)
23 जानेवारी – दुपारी भोजन – कोरेगाव भीमा
रात्री मुक्काम – चंदननगर (खराडी बायपास) पुणे
24 जानेवारी – पुणे शहर प्रवास- जगताप डेअरी- डांगे चौक- चिंचवड- देहूफाटा. रात्री मुक्काम – लोणावळा
25 जानेवारी – दुपारी भोजन – पनवेल. रात्री मुक्कामी – वाशी.
26 जानेवारी – चेंबूरवरून पदयात्रा – आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क