काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवल्यानंतर मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी देवरा यांच्यासह शिंदे गटात जाणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश काढले आहेत.दक्षिण मुंबईतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह (Varsha Gaikwad) यांनी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. विशेष म्हणजे देवरांसारखा बडा नेता जाऊनही 300 पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात गर्दी करीत दक्षिण मुंबई अजूनही CONGRESS सोबतच असल्याची ग्वाही दिली, अशी माहिती मिळत आहे.मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्यासोबत दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेविका सुशीबेन शहा, सुनील नरसाळे, रामबच्चन मुरारी, हंसा मारू, अनिता यादव हे माजी नगरसेवक, दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि अॅड. त्र्यंबक तिवारी यांच्यासह 23 पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेना गटात प्रवेश केला. या 23 जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी रविवारी रात्रीच त्यांचे निलंबन केले.या बैठकीदरम्यान वर्षा गायकवाड यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करीत काँग्रेसमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार असल्याचा विश्वास दिला. तसेच त्यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील कार्यकर्त्यांशी एक-एक करून दिवसभर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शिवाय सर्व कार्यकर्त्यांना पक्षाकडून हवे ते पाठबळ मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कार्यकर्त्यांनीही पदाची अपेक्षा न ठेवता पूर्वीपेक्षा अधिक जोमाने पक्षासाठी काम करू, असा विश्वास व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.
‘ते लोक होते वेगळे…’
पक्ष आणि विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करणारे लोक यशस्वी होतात. दुर्दैवाने मिलिंद देवरांनी पक्षाशी आणि विचारधारेशीही फारकत घेतली. पण एक व्यक्ती सोडून गेल्याने ना पक्ष खिळखिळा होतो ना विचारधारा कमकुवत होते! उलट त्यामुळे मला आणि असंख्य कार्यकर्त्यांना काम करायला बळ मिळाले आहे.यावेळी वर्षा गायकवाड यांनी सुरेश भटांच्या काव्यपंक्ती सांगितल्या.
‘ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे… मी मात्र थांबून पाहतो, मागे किती जण राहिले?’
हे मागे राहिलेले लोक सच्चे काँग्रेसी आहेत आणि तेच आम्हाला विजयपथावर घेऊन जातील, अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.