मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्य शासनाला, स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीपूर्वीच आवश्यक अधिकाऱ्यांच्या बदल्या, खाते बदल आदी घडामोडी करून घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या अधिका-यांच्या बदल्यांना वेग आला आहे. मात्र या बदल्या राजकीय हेतूने केल्या जात असल्याची चर्चा पालिका वर्तूळात सुरू आहे.मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या आदेशाने सह आयुक्त रमेश पवार (सुधार) यांच्याकडील खाते काढून घेत ते उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडील (विशेष) हे खाते काढून ते सह आयुक्त रमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.विशेष म्हणजे सह आयुक्त पवार (सुधार) हे १ एप्रिल २०२४ रोजी सेवेतून निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वीच त्यांच्याकडील (सुधार) खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता पालिकेतील अधिकारी वर्गात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आणखीन कोणत्या अधिकाऱ्यांचे खाते बदल किंवा बदली होणार आहे, कोणाला कुठे पाठवले जाईल, याबाबत अधिकारी वर्गात कुजबुज सुरू आहे. सह आयुक्त रमेश पवार (सुधार) हे राज्यात महविकास आघाडीचे सरकार असताना आणि मुख्मंत्रीपदावर उद्धव ठाकरे हे असताना त्यांना विशेष बाब म्हणून पालिका आयुक्त कार्यालयातून थेट नाशिक महापालिका आयुक्त पदावर पाठविण्यात आले होते.मात्र राज्यात राजकीय भूकंप झाल्यावर रमेश पवार यांना पुन्हा मुंबई महापालिकेत माघारी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांना सह आयुक्त रमेश पवार (सुधार) या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली. उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे (विशेष) काही दिवसांपूर्वीच उपायुक्त चंदा जाधव यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.असे असताना पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने सह आयुक्त रमेश पवार (सुधार) यांच्याकडील खाते काढून घेत ते उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडील (विशेष) हे खाते काढून ते सह आयुक्त रमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने तसे परिपत्रक काढण्यात आले आहे. मात्र उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडील ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्प’ हे खाते त्यांच्याकडे तसेच ठेवण्यात आले असल्याचे समजते.अधिका-यांच्या बदल्या राजकीय हेतूने होत आहेत. लोकसभा निवडणुक जवळ येईल तसे बदल्यांचे सत्र वेगात सुरू होईल. उलटसुलट होत असलेल्या बदल्यांचा अधिका-यांनाही त्रास होतो. मात्र ते बोलू शकत नाहीत. मात्र अधिकारशाहीचा गैरवापर अधिका-यांच्या बदल्या करताना केला जात आहे.- रमेश भुतेकर, उपाध्यक्ष, म्युनिपल इंजिनिअर्स असोशिएशन