विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेला निकाल हा सध्याच्या राजकीय परिस्थितीला साजेसा आहे. मित्र पक्षाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अभय दिले नसते तरच नवल वाटले असते. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांनी सूची 10 आणि लोकशाहीची थट्टा केली आहेसर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा ठरवत नार्वेकर यांनी न्याय यंत्रणेची खिल्ली उडवली आहे, अशी टीका काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्रीॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलीamrawati येथे त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
शिवसेना केवळ बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतरudhav thakre यांचीच आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. मात्र काही तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदेची असल्याचा उफराटा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती चुकीची आहे, असे म्हटल्यानंतरही नार्वेकर यांनी भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य ठरविल्याची टीकाही आमदार अॅड. ठाकूर यांनी केली.
नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्रतेपासून वाचविले आहे. ही सरळ न्याय व्यवस्थेची थट्टा आहे, असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या. विधानसभा अध्यक्षांना असलेल्या आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकराचा नार्वेकर यांनी गैरवापर केल्याचे यापेक्षा मोठे उदाहरण विधिमंडळाच्या इतिहासात असणार नाही, असे त्या म्हणाल्या. विधिमंडळाच्या न्यायदानाच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे. जनतेच्या दरबारात जावे लागणार आहे, म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांनाही त्यांनी अपात्र केले नाही, असा घणाघातही त्यांनी केला.विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा निश्चितच समर्थनिय नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली तर आपण महाविकास आघाडी म्हणून त्यांच्या बाजुने असूच. आता एकसंघपणे लोकशाहीची थट्टा करणाऱ्या शक्तींना गाडल्याशिवाय राहणार नाही असा निश्चयही आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. विधिमंडळातील आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल काहीही आला असला तरी लवकरच जनतेच्या न्यायालयात या विषयाची सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणूक जवळच आहे. त्यामुळे सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपला मतदार धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वासही काँग्रेसच्या नेत्या अॅड. ठाकूर यांनी व्यक्त केला. देशात इंडिया आघाडीला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल असेही त्यांनी नमूद केले.