• Sat. May 3rd, 2025

तलाठीभरतीसाठी 10 लाख, उत्तरासाठी 3 लाख; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Byjantaadmin

Jan 11, 2024

तलाठीभरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येतो आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. विद्यार्थ्यांच्या नुकसानासाठी थेट बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा विखे-पाटील यांनी दिला होता. मात्र, घोटाळा झाल्याच्या आरोपावर विरोधी पक्ष ठाम आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून परीक्षा घेणाऱ्या संस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, तसेच सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. घोटाळ्यामध्ये ज्या खासगी कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात आली होती, त्यातील कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी खासगी कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी. पेपरफुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पदभरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. या संपूर्ण पदभरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी आपल्या पत्राद्वारे वडेट्टीवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *