साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारावर आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्नपूर्णी चित्रपटामध्ये नयनतारानं महत्वाची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सवरील अन्नपूर्णी नावाचा चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये प्रभु श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत होते. असा संवाद होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याविषयी उल्लेख केला होता. त्यानंतर आव्हाड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी कऱण्यात आली होती. आता नयनतारा ही अडचणीत सापडली आहे.निलेश कृष्णन या नवोदित दिग्दर्शकानं अन्नपूर्णी नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यामध्ये नयनतारानं अन्नपूर्णी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार नयनतारासह चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. इंडिया न्यूजनं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.प्रभु श्रीराम यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आणि लव जिहादचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी अन्नपूर्णीवर टीका करण्यात येत आहे. तसेच त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी अन्नपूर्णीवरील वाढता वाद पाहता नेटफ्लिक्सवरुन हा चित्रपट काढून टाकण्यात आला आहे.नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला अन्नपूर्णी नावाचा चित्रपट हा हिंदू धर्मियांच्या विरोधात असून त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. १ डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. २९ डिसेंबर रोजी तो नेटफ्लिक्सवर आला. त्याच्या एक आठवड्यानंतर तो ओटीटीवरुन हटविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.