मराठा समाजाचा सर्वे २० जानेवारीपूर्वीच करावा – सकल मराठा समाजाची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
निलंगा/प्रतिनिधी राज्य मागास आयोगाकडून मराठा समाजाचा केला जाणारा सर्वे २० जानेवारी पूर्वीच करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे तहासिलदारामार्फत निवेदन देऊन करण्यात आली.मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींमधून आरक्षण मागणीसाठी राज्यभरातून मराठा समाजबांधव २० जानेवारी ला मुंबईला जाणार आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी जो सर्वे केला जाणार आहे तो २० जानेवारी किव्हा त्यापुढे गेला तर १००% सर्वे होणार नाही. कारण काही गावांमध्ये एकही मराठा घरी न थांबता अख्खे गावं आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे.केला जाणारा सर्वे हा १००% व्हावा त्यासाठी प्रत्येक मराठा कुटुंब आणि मराठा व्यक्ती कोणीही यातून सुटू नये यासाठी २० जानेवारीच्या आता सर्वे पूर्ण करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा, जिजाऊ ब्रिगेड,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, संभाजी सेना व सकल मराठा समाज यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते.