• Fri. May 2nd, 2025

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 26 हजार 924 नवमतदारांची नोंदणी

Byjantaadmin

Jan 9, 2024

 

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 26 हजार 924 नवमतदारांची नोंदणी

  • उदगीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार
  • पात्र नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

लातूर (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 22 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 18 ते 19 वर्षे वयोगटातील 26 हजार 924 नवमतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 6 हजार 131 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. हे नवमतदार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबरला जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नवमतदारांची नोंदणी तसेच मयत व दुबार नावे वगळणे, मतदान कार्ड, पत्त्यात दुरुस्ती अशा कामांसाठी 9 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. या अर्जावर 26 डिसेंबरपर्यंत कार्यवाही करण्यात आली. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांमध्ये ही मुदत आता 12 जानेवारी केली आहे. तर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी 22 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे.

या दरम्यान दुबार नावे, तसेच मयतांची नावे वगळणे हे काम प्रामुख्याने करण्याचे निर्देश सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासोबतच नवमतदारांनाही नोंदणीसाठी संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी आता 5 जानेवारीऐवजी 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 22 जानेवारी नंतरही मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे. तरी अद्याप नाव न नोंदविलेल्या पात्र व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार नोंदणीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघात 3 हजार 136, लातूर शहर मतदारसंघात 4 हजार 364, अहमदपूर मतदारसंघात 6 हजार 44, उदगीर मतदारसंघात 6 हजार 131, निलंगा मतदारसंघात 3 हजार 794 आणि औसा मतदारसंघात 3 हजार 455 नवमतदारांनी नाव नोंदणी केली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *