• Fri. May 2nd, 2025

आठ महिला कर्मचाऱ्यांवर बलात्कार झालाच नाही!चौकशीत उघड

Byjantaadmin

Jan 9, 2024

मुंबई : नागपाडा मोटार परिवहन विभागाच्या आठ शिपाई महिलांवर त्यांच्याच वरिष्ठांनी बलात्कार केल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघडकीस आले आहे. या आठही महिलांची पोलिसांनी जबानी नोंदविली असून त्यांनी अशा प्रकारचे कुठलेही पत्र पाठविले नसल्याचे आपल्या जबानीत म्हटले आहे. दरम्यान, बलात्काराच्या या बोगस लेटरची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत.

आठ महिला कर्मचाऱ्यांवर बलात्कार झालाच नाही!चौकशीत उघड; बोगस लेटरबाॅम्बची मुंबई पोलिसांकडून गंभीर दखल

नागपाडा मोटार परिवहन विभागाात कार्यरत असलेल्या आठ महिला शिपायांवर त्यांच्याच वरिष्ठांनी लैंगिक अत्याचार केल्याचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात या महिला पोलिसांनी पोलीस उपायुक्तांसह दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस हवालदारांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे अश्‍लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले. काही महिला गरोदर राहिल्या, त्यांना जबदस्तीने गर्भपात करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांचे अश्‍लील व्हिडीओ बनवून नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले होते, असे अनेक गंभीर आरोप पत्रात करण्यात आले होते.

या पत्राची प्रत्येक एक प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त गुन्हे, वाहतूक व प्रशासन आणि पोलीस उपायुक्त मोटार परिवहन विभागाला पाठविण्यात आले होते. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच, मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भातील वृत्त काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीदरम्यान या आठही महिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीतून त्यांनी संबंधित पोलिसांवर कुठलेही आरोप केलेले नाही किंवा त्यांच्यावरील बलात्काराबाबत कोणालाही तक्रार केली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे संबंधित पत्र बोगस असून केवळ पोलिसांची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे उघडकीस आले आहे.

यासंदर्भात पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. या महिलांनी कोणालाही तक्रार अर्ज पाठविलेला नाही. त्यांनी त्यांच्या जबानीत ही माहिती दिली आहे.

अज्ञात व्यक्तीचा खोडसाळपणा

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ते पत्र खोडसाळपणे व्हायरल केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. ते पत्र स्पीड पोस्टने पाठविण्यात आल्याने ते कोणी पाठविले, याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

महिला आयोगाकडूनही दखल

दरम्यान, या वृत्ताची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांचा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतर त्याचा एक अहवाल राज्य महिला आयोगाला सादर केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *