लातूर : लातूरला ब्रॉडगेज होऊन १६ वर्ष होऊन गेले आहेत. त्यावेळेपासून येथे पीटलाइन करावी अशी मागणी होती. पण रेल्वेकडून सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र शुक्रवारी (ता. पाच) रेल्वेने लातूरसाठी पीटलाइन मंजूर केली आहे. या कामाकरिता २७ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर केला आहे. पीटलाइन होणार असल्याने आता लांब पल्ल्याच्या रेल्वे येथे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.लातूर येथे १९२३ मध्ये नॅरोगेज रेल्वे सुरु झाली होती. त्यानंतर २००७ मध्ये या नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. २००८ मध्ये लातूर-मिरज ही रेल्वेलाईन नॅरोगेजवरून ब्रॉडगेजवर गेली. याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रोजगार हमी योजनेतून खडीचा पुरवठा केल्यानेही हे काम होऊ शकले होते. देशात अशा पद्धतीचा पहिलाच प्रयोग होता. त्यानंतर लातूर-मुंबई ही पहिली एक्सप्रेस त्यांच्यामुळे येथे सुरू होऊ शकली. त्यानंतर हळूहळू या मार्गावर काही रेल्वे सुरु झाल्या.
पण लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र सुरु होऊ शकल्या नाहीत. कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-धनबाद अशी एखादी दुसरीच रेल्वे आठवड्यातून गेल्या काही वर्षांपासून धावू लागली होती. येथील रेल्वे स्थानकावर पीटलाइन नसल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे येऊ शकत नव्हत्या. त्यामुळे पीटलाइन करावी अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. अनेक लोकप्रतिनिधींनी देखील ही मागणी लावून धरली होती.खासदार सुधाकर शृंगारे यांनी पाठपुरावा केला होता. पण रेल्वे बोर्डाकडून सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे पीटलाइनचा प्रश्न रेल्वेच्या लालफितीतच अडकला होता. पण आता लातूरला पीटलाइन होणार आहे. या संदर्भात शुक्रवारी (ता. पाच) रेल्वे बोर्डाचे सहसंचालक गती शक्ती (स्थापत्य) अभिषेक जागवत यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून लातूरच्या पीटलाइनला मंजुरी दिल्याचे कळवले आहे. या करिता २७ कोटी ७० लाखाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
आता देखभाल दुरुस्ती लातुरातच
येथील रेल्वेस्थानकावर ही पीटलाइन तयार केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीचे कामही येथे केले जाऊ शकते. सध्या लातूर-मुंबई या रेल्वेचे येथे केवळ पाणी भरणे आणि साफसफाई करणे एवढेच काम केले जात आहे. त्याची देखभाल दुरुस्तीची काम मात्र मुंबईत केले जात होती. या पीटलाइनमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेची देखभाल व दुरुस्ती, वॉशिंग येथे होऊ शकणार आहे.
आता देखभाल दुरुस्ती लातुरातच
येथील रेल्वेस्थानकावर ही पीटलाइन तयार केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीचे कामही येथे केले जाऊ शकते. सध्या लातूर-मुंबई या रेल्वेचे येथे केवळ पाणी भरणे आणि साफसफाई करणे एवढेच काम केले जात आहे. त्याची देखभाल दुरुस्तीची काम मात्र मुंबईत केले जात होती. या पीटलाइनमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेची देखभाल व दुरुस्ती, वॉशिंग येथे होऊ शकणार आहे.