नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या आणि वायएसआर तेलंगण पक्षाच्या संस्थापक वाय.एस. शर्मिला यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी वायएसआर तेलंगण पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केल्याची घोषणा केली.आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. शर्मिला यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आंध्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल, असे खर्गे म्हणाले.
यावेळी शर्मिला यांनी वायएसआर तेलंगण पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याचे जाहीर केले. त्या म्हणाल्या, राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे, असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. काँग्रेस पक्षासाठी काम करताना मला आनंद वाटत आहे. आपण ख्रिश्चन असल्यानात्याने मणिपूरमधील हिंसाचाराने व्यथित झाले आहे. सत्तेत धर्मनिरपेक्ष पक्ष नसेल तर असेच घडणार, असा आरोप त्यांनी केला.काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि हा पक्ष सर्व समुदायाची सेवा करतो आणि सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम करतो. वायएसआर तेलंगण पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करताना मला आनंद होत आहे. आपल्या वडिलांनी केवळ काँग्रेसचीच सेवा केली नाही तर आपले जीवनही समर्पित केले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत असून हे पाहून आपल्या वडिलांना आनंद होत असेल, असेही शर्मिला म्हणाल्या.