• Wed. Apr 30th, 2025

…त्यामुळे ‘वंचित’ महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक; संजय राऊत यांचं मोठं विधान

Byjantaadmin

Jan 5, 2024

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. अशात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यात चर्चा सुरु आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर एकमत झालं तर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होऊ शकते. मात्र या आघाडीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.

“वंचित’ महाविकास आघाडीचा घटक”

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झाली आहे. ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कुठलीही हरकत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्याच सन्मानाने आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करत आहोत. प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचेच नेते नाहीत. तर या देशातील वंचित समाजाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रात अतिशय सन्मानाने चर्चा होत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“आम्हीही तयारी केलीय”

काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितलं आहे. प्रदेश कॉंग्रेसने 10 जानेवारीपर्यंत उमेदवरांची नावं मागितली असल्याचं नागपूर काँग्रेसचेजिल्हाध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितलं. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. एखादा पक्ष चाचपणी करत असेल की ते कुठल्या जागेवर लढू शकतात. यावर चुकीचं काहीच नाही. माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील 48 जागांची चाचणी केली आहे. प्रत्येक पक्ष करतो, त्यांनी तसं काही केलं आहे. तर त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांचा शिंदेंना टोला

एकनाथ शिंदे एवढा आत्मविश्वास कुठून आणतात, ते पहावं लागेल. निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत विधानसभा निवडणुका हे घेणार नाहीत का? अजून मुख्यमंत्री नेमण्याची संविधानाने तरतूद केलेली नाही. सहा जानेवारीला काय निकाल लागतो, यावर अख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. घटनाबाह्य पद्धतीने मुख्यमंत्री बसलेले आहेत. घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहे, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. या देशात सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed