• Wed. Apr 30th, 2025

लातूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण

Byjantaadmin

Jan 5, 2024

लातूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण

मिशन मोडवर काम करण्यासाठी 9685 अधिकारी,कर्मचाऱ्यांची यांची नियुक्ती

लातूर  (जिमाका) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी केली आहे. या मोहिमेत एकही कुटूंब वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन लातूर जिल्ह्यातील ही मोहिम प्रभावीपणे राबवून यशस्वी करू, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी व्यक्त केला.आज मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाबाबत सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांनी घेतली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त रामदास कोकरे , महानगरपालिका उपआयुक्त मयुरा शिंदेकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ( दृश्यप्रणालीद्वारे ) उपस्थित होते.

या सर्वेक्षणासाठी सुसुत्रता रहावी यादृष्टिने शासनाने नियोजन केले आहे. हे सर्वेक्षण मिशन मोडवर व्हावे यादृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी 9685 अधिकारी,कर्मचाऱ्यांची यांची नियुक्ती केली आहे गरज पडली तर त्यात अजून मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्वेक्षण कालावधीत कोणीही मुख्यालय सोडणार नाही अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.महानगरपातळीवर मनपाचे आयुक्त, वार्ड निहाय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुकापातळीवर महसूल यंत्रणा, संबंधित नगरपरिषदा तर ग्रामीण भागात ग्रामपंचायती, पंचायत समिती यांच्या समन्वयातून हे सर्वेक्षण युद्धपातळीवर 3 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. मिशन मोडवर असलेल्या या सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सांगून या कालावधीत जर कोणत्या बैठका असतील त्या बैठका इतर दिवशी घेतल्या जातील, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी सर्व अधिकाऱ्यांना असे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed