आता गुरुवार ठरला ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य सेवा दिन; जिल्ह्यात सुरुवात
लातूर (जिमाका): ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचे वाढते प्रश्न लक्षात घेऊन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या सूचनेवरून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्याचा प्रत्येक गुरुवार हा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासने, मानसिक समुपदेशन, मधुमेह, रक्तदाब याची प्राथमिक चाचणी होणार आहे.
आज पाखरसांगवी (ता. लातूर) उपकेंद्रातून या जिल्हास्तरीय योजनेची सुरवात विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे व उपकेंद्राचे डॉक्टर, इतर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत झाली.
लातूर जिल्ह्याला आरोग्य सेवेत केलेल्या कार्यसाठी देशपातळीवर गौरविले आहे. इथून पुढे ह्या दर्जात आणखी सुधारणा करण्यासाठी जिल्हास्तरावरून मोठे प्रयत्न केले जात आहेत. राज्य स्तरावरूनही आरोग यंत्रणा बळकट करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बालकं आणि जेष्ठ नागरिक हे आरोग्याच्या बाबतीत बहुतांशवेळी घरच्यांवर अवलंबून असतात. त्या बालकांना पालक म्हणून काळजी घेणारे असतात पण जेष्ठाच्या बाबतीत म्हणावे तसे सहकार्य होत नाही आणि 60 वर्षानंतर त्यांच्या आरोग्याच्या समस्या सुरु होतात म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणारा दिवस म्हणून गुरुवार निवडायच्या सूचना केल्या त्या प्रमाणे या आठवड्या पासून दर गुरुवारी जेष्ठ नागरिकांच्यासाठी विशेष तपासण्या आणि मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, योगा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी दिली.
यावेळी आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. अर्चना भोसले आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांनी उप केंद्राचे कामकाज जाणून घेतले. तिथल्या औषधाचा साठा. डॅश बॉर्डवर असलेली माहिती, त्यात एकूण लोकसंख्यातील 30 वर्षाच्या पुढची लोकसंख्या त्यांची तपासणी, तपासणी नंतर पुढच्या हॉस्पिटलला निदानासाठी पाठवून त्याची खात्री करून त्यांना औषधोपचार सुरु केले जातात. अशी माहिती आरोग्य उप केंद्राच्या डॉ. वाघमोडे यांनी दिली यावेळी झालेल्या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. अर्चना भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व जेष्ठ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या.