नागपूर: पदभार स्वीकारल्यापासून सात महिन्यांतच मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरेंना अनपेक्षितपणे पदावरुन दूर करण्यात आलं आहे. २९ डिसेंबरला त्यांची बदली करण्यात आली. त्यामागचं कारण त्यांना देण्यात आलेलं नाही. त्यांना नवी पोस्टिंगही देण्यात आलेली नाही.रेल्वे स्थानकांमध्ये थ्रीडी सेल्फी बूथ लावण्यात आलेले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. या बूथवर होणाऱ्या खर्चाबद्दल विचारणा करणारा अर्ज माहिता अधिकारी कार्यकर्त्यानं केला होता. त्या अर्जाला उत्तर देताना मानसपुरेंनी थ्रीडी सेल्फी बूथवर झालेल्या खर्चाचे आकडे दिले. नेमकं त्यानंतरच शिवराज मानसपुरेंची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली.
मानसपुरेंच्या जागी स्वप्निल निला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मानसपुरेंचा सन्मान केला होता. रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यात, फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यात आणि चोरी रोखण्यात मानसपुरेंनी वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं होतं. रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पीएम सेल्फी बूथ उभारण्यात आले आहेत. त्यावर नेमका किती खर्च झाला असा प्रश्न अमरावतीमधील सामाजिक कार्यकर्ते अजय बोस यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून विचारला होता. मध्य, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि वायव्य रेल्वेनं पीएम सेल्फी बूथसाठी किती रुपये खर्च केले असे प्रश्न अर्जातून विचारण्यात आले होते. त्यांना १८७ बूथची माहिती देण्यात आली. पैकी १०० बूथ उत्तर रेल्वेच्या अखत्यारितील होते. मध्य रेल्वेचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही विभागानं बूथवर झालेल्या खर्चाची सविस्तर माहिती दिली नाही. मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, ३० स्थानकांवर तात्पुरते बूथ उभारण्यात आले असून २० स्थानकांवर कायमस्वरुपी बूथ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागांचा समावेश आहे. एका कायमस्वरुपी बूथसाठी ६.२५ लाख (करांशिवाय) आणि एका तात्पुरत्या बूथवर १.२५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती मध्यम रेल्वेनं दिली.