श्री. राघवेंद्र स्वामी मठ येथील नव्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न
निलंगा(प्रतिनिधी):- निलंगा नगरीतील श्री.राघवेंद्र स्वामी मठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या नूतन वास्तूचे लोकार्पण प.पू. श्री श्री १००८ श्री. सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते पार पडले. या मंगल सोहळ्याला माजी खासदार रूपाताई पाटील अक्कांसह माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित राहून गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले व नागरिकांशी संवाद साधला. तसेच स्वामीजींच्या हस्ते आयोजित मंगलारतीमध्ये सहभाग घेऊन श्रींची आरती केली. यावेळी श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींच्या हस्ते फल मंत्राक्षदा देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
श्री. राघवेंद्र स्वामी मठ हा गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या अध्यात्मिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्य करत आहे. समाजाच्या विकासाचा मार्ग हा अध्यात्मातूनच जातो. अध्यात्मिक प्रगतीशिवाय कोणताही माणूस त्याची भौतिक व शारीरिक प्रगती साधू शकत नाही. हे ओळखून श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या परंपरेतील सर्व गुरुजनांनी कायमच यासाठी प्रयत्न केले आहेत. आज हे मठ आपल्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक विकासाचे केंद्र बनले आहे. प.पू. श्री श्री १००८ श्रीसत्यात्मतीर्थ स्वामीजींच्या हस्ते आज उद्घाटन झालेली ही नवी वास्तू नक्कीच मठात येणाऱ्या भाविकांच्या जीवनात नवे बदल घडविण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडेल,असा विश्वास यावेळीआमदार निलंगेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी वे.शा.सं.वेणुगोपालजी काशीकर, मठाधिपती माधवाचार्य पिंपळे महाराज, राज्याचे माहिती संचालक गणेश रामदासी, उपविभागीय अधिकारी शोभाताई जाधव, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, मुख्याधिकारी गजानन शिंदे, भाजपा उपजिल्हाध्यक्ष शेषेराव ममाळे, शहराध्यक्ष अॅड. वीरभद्र स्वामी, ज्येष्ठ विधिज्ञ अनंतराव सबनिस, अॅड.सी.जे. सबनिस , लिंबन महाराज रेशमे आदीसह ब्रम्हवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.