राखी बांधणाऱ्यारश्मी शुक्ला फडणवीसांकडून बढतीची ओवाळणी मिळाली असून आता अधिकृतपणे फोन टॅप होतील अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शुक्ला यांनी खडसे यांचाही फोन टॅप केला असल्याचा आरोप होता. एकनाथ खडसे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच सरकार आल्यानंतर रश्मी शुकला यांना बढती होईल हे माहिती होते. त्यांनी माझा फोन टॅप केला होता. आपल्या सरकारमध्ये आपले ऐकणारे अधिकारीही हवे आहेत. आता पोस्टिंग मिळाली. पूर्वी अनधिकृत पण आता अधिकृतपणे टॅप होतील अशी टीका खडसे यांनी केली.
फडणवीसांनी दिली ओवाळणी
एकनाथ खडसे यांनी म्हटले की, रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांना राखी बांधली. एका प्रकारे ही रक्षाबंधनाची भेट असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधकांनी आता सावध राहायला हवं असेही खडसे यांनी म्हटले. राज्याला पहिल्या पोलीस महासंचालक मिळाल्या आहेत. त्यामुळे आता महिला सुरक्षेवर लक्ष दिलं पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे खडसे यांनी म्हटले. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, राज्यात महिला सुरक्षित नाहीत. आता रश्मी शुक्ला यांनी महिला सुरक्षेवर लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य पोलीस महासंचालकपदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात.केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत
रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले, भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची mumbai च्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री यांचीही भेट घेतली.
पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल
काही महिन्यांपूर्वी pune पोलिसांनी आयपीएस पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला आहे. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाची सूत्रे येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.