महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पाठवण्याची जणू स्पर्धाच राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये लागली आहे. हिरे उद्योगापाठोपाठ आता महानंद दुग्ध प्रकल्पही गुजरातच्या दावणीला सरकारने बांधला आहे. त्यामुळे जर महाराष्ट्राचा विकास होईल, असा कुणाचा समज असेल तर महायुतीच्या नेत्यांनाच एकदाचे गुजरातला घेऊन जा म्हणजे काय तो विकास होईल, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला.राज्यातील उद्योग गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावर बुधवारी यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला. अमरावती येथे बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिऱ्यांचा उद्योग गुजरातमधील सुरत येथे हलविण्यात आला आहे. त्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘हिऱ्यांचा व्यापार गुजरातला नेण्याचा प्रताप महाराष्ट्र सरकारने केला. महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प हळूहळू गुजरातला स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रोजगारनिर्मिती ढासळत चालली आहे. आधीच बेरोजगार असलेल्या युवकांच्या संख्येत मोठी भर पडत आहे.
तसेच, ‘अशातच राज्य सरकारने महानंद हा सहकार क्षेत्रातील दुग्ध व्यवसायातील शिखर प्रकल्पही गुजरातच्या वाट्याला नेण्यात आला आहे. अत्यंत चुकीचा असा हा निर्णय आहे, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.’याशिवाय, ‘महानंदा हा प्रकल्प एनडीडीबी योग्यरीत्या चालवेल आणि पुन्हा महाराष्ट्रात परत देईल, असा भाबडा आशावाद राज्याचे दुग्धविकासमंत्री व्यक्त करीत आहेत. वास्तविक केंद्रात एनडीए सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून सहकारी संस्था मोडीत काढल्या जात आहेत,’ असा आरोपही ठाकूर यांनी केला.तर ‘शंभर वर्षांहून अधिक सहकाराची वैभवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील सहकाराचे जाळे मोडून काढण्याचा चंगच महायुती सरकारने बांधला आहे. जागतिक मंदीच्या काळातही गेल्या काही वर्षात ज्या सहकारामुळे महाराष्ट्र तग धरू शकला, तो सहकारच सरकार उद्ध्वस्त करीत आहे,’ असे त्या म्हणाल्या.
याचबरोबर ‘ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि विलासराव देशमुख यांनी सहकारावर विशेष भर दिला. सहकारातील एकही संस्था चालवण्याचा अनुभव आणि कुवत नसलेल्या महायुती आणि भाजप सरकारने महानंद प्रकल्पही गुजरातमध्ये नेऊन ठेवला आहे,’ अशी टीकाही केली आहे.’दिल्लीश्वरांची तळी उचलण्यात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री धन्यता मानत आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये नेऊन महाराष्ट्राचा विकास साध्य होणार आहे, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाच गुजरातला नेऊन ठेवावे म्हणजे एकदाचा काय तो विकास होईल,’ अशा शब्दात ॲड. ठाकूर यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.