• Tue. Apr 29th, 2025

मतदान पुनर्निरीक्षण कामात कुचराई भोवली, 26 महिला ‘बीएलओ’ विरोधात गुन्हे दाखल!

Byjantaadmin

Jan 4, 2024

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस येथे तब्बल 26 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर कामात दिरंगाई व टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

आगामी काळात देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज आहे. याचअनुषंगाने सध्या संपूर्ण देशात नवीन मतदार नोंदणी करणे, स्थलांतरित, मृत मतदारांची नावे वगळणे, भौगोलीक समान नोंदी पडताळणे ही कामे करण्यासाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व अन्य कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांना अतिशय पारदर्शकपणे निवडणुका मतदान पुनर्निरीक्षणाचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण चंद्रपूर  जिल्ह्यातील घुग्गूस येथे तब्बल 26 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर कामात दिरंगाई व टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात मतदान पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात भौगोलिक समान नोंदी पडताळणे ही कामे करण्यासाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व अन्य कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्वांना हे काम अतिशय पारदर्शक व कर्तव्यदक्षतेने हे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील 26 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई केली. याचसोबत त्यांनी काम करण्यास टाळाटाळ केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. यामुळे या 26 अधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. पंरतु त्यांनी याबाबतचा कुठलाही खुलासा सादर केला नाही. एक तर कामात कुचराईबद्दल खुलासाही न दिल्याने उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम यांनी तहसीलदारांना संबंधित बीएलओवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तहसीलदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून घुग्गुस येथील तलाठी मनोज कांबळे यांना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला लावली. त्यांच्या तक्रारीनुसार 26 बीएलओवर भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम 1950चे कलम 32 आणि भादंवि 1860 चे कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या 26 पैकी 26 बीएलओ या महिलाच आहेत. निवडणुकीच्या मतदान पुनर्निरीक्षण कार्यक्रमात दिरंगाई केल्याप्रकरणी थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याने याबाबत प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे. मतदान पुनर्निरीक्षण कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा असून या कामात कुठलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed