पुणे शहरालगत असणाऱ्या वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलीने दारू पिण्यास नकार दिल्याने बापाने मुलीचा धारधार शस्त्राने वार करू खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. अक्षरा फकिरा दुपारगुडे (वय १६) असे खून झालेल्या मुलीचं नाव आहे. फकिरा गुंडा दुपारगुडे (वय ४५) असे खून केलेल्या बापाचे नाव आहे. खून केल्यानंतर नराधम बाप घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही तासात पुण्यातून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे फकीरा दुपारगुडे हा आपल्या मुलीसोबत रहाण्यास आहे. त्याला दारूचे व्यसन होते. बुधवारी मुलीने बापाला दारू पिण्यास नकार दिला. त्यावरून त्यांची भांडणे झाली. मात्र, बापाने रागाच्या भरात धारधार शस्त्राने वार करून तिचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पाहून फकिरा हा घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ६ चे अधिकारी यांनी हातात घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखत त्यांनी सूत्र हलवली. त्यांना माहिती मिळाली की, फकिरा दुपारगुडे हा हडपसर येथील गाडीतल येथे थांबला आहे. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना एक व्यक्ती संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतलं. त्याला त्याचे नाव विचारलं असता त्याने फकिरा दुपारगुडे असे सांगितले. त्याला गुन्ह्याबाबत विचारले असता त्याने कबुली दिली. दारू पिण्याच्या कारणावरून माझे आणि मुलीचे वाद झाले होते. त्यावरून मी तिचा खून केला असल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.