• Tue. Apr 29th, 2025

पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होणार; ठाकरेंची खळबळजनक भविष्यवाणी

Byjantaadmin

Nov 28, 2022

देवीकडे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी साकडं घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. याबाबत ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे.

 
मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी नुकतंच गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत राजकीय भविष्यवाणीही करण्यात आली आहे. ‘आसाममध्ये महाराष्ट्र भवन व महाराष्ट्रात आसाम भवन निर्माण करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. एकंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शिल्लक गटासह आसामातच राहावे लागेल. त्याची सोय ते जाता जाता करीत असावेत,’ असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गुवाहाटी दौऱ्यादरम्यान कामाख्या देवीकडे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी साकडं घातल्याचं सांगितलं होतं. यावरून ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. ‘महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. तेव्हा हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच,’ अशी टीका करण्यात आली आहे.
‘कामाख्या देवी खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही’

‘कामाख्या देवीस न्याय देवता असेही म्हटले जाते. ‘बळी’ची लाच दिली म्हणून ती खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही. कोणतीही देवी किंवा देव गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही. त्यामुळे कोप झालाच तर तो मिंधे गटाच्या आमदारांवर होईल. म्हणून धावत पळत हे लोक देवीच्या चरणाशी पोहोचले. मिंधे गटापाशी आज कोणतेही पुण्य उरलेले नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची अखंड बदनामी सुरू आहे. शिवरायांचा महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकचे मुख्यमंत्री करीत आहेत. तेव्हा नवस बोलायचा तर तो या महाराष्ट्रद्रोही लोकांना धडा शिकविण्यासाठी बोलायला हवा, पण त्याऐवजी या मंडळींनी नवस केला आहे आणि बळी दिलाय तो आपली सत्ता टिकविण्यासाठी. मग या मंडळींना देवीचा आशीर्वाद कसा मिळणार?’ असा खरमरीत सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed